वीरशैव बॅंकेतर्फे सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर | पुढारी

वीरशैव बॅंकेतर्फे सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

श्री वीरशैव को-ऑप बॅंकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. दीड हजारांहून सभासद ग्रामीण भागातील सभासद असूनही त्यांनी मोबाईल, ई-मेलच्या माध्यमाद्वारे या सभेस प्रतिसाद दिला.

यावेळी वीरशैव बॅंकेच्या वरिष्ठांनी सांगितले की, समवैचारिक सहकऱ्यांनी १९४२ साली लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज ठेव, कर्जे आणि ठेव गुंतवणूक २००० कोटींचा व्यवसाय करून वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्याचबरोबर सन २०२०-२०२१ मध्ये साडेसात कोटींचा नफा बॅंकेला झाला आहे. तसेच बॅंकेचा अहवाल आणि कामकाजाचा व आर्थिक प्रगतीचा आढावा यावेळी वरिष्ठांकडून मांडण्यात आला.

सभासदांना १२ टक्के डिव्हिडंट जाहीर केला असून बॅंकेने ० टक्के एनपीए परंपरा राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच ऑडिट वर्ग हा ‘अ’ मिळाला आहे. बॅंकेचा शाखा विस्तार वाढविण्यासाठी कर्नाटक राज्यातील मुधोळ को-ऑप बॅंक, विरशैव बॅंकेत सामावून घेण्याबरोबरच तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात कार्यविस्ताराकरीता उपविधी दुरुस्तीचा प्रस्ताव सभेपुढे यावेळी ठेवण्यात आला.

सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांबाबतची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी शंकर मांगलेकर यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, “बॅंकेच्या प्रगतीत संचालक मंडळ आणि सभासदांचे बहुमूल्य योगदान आहे.” याप्रसंगी बॅंकेने केलेल्या आर्थिक वर्षातील प्रगतीबद्दल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

सभेचे नियुक्त निरीक्षक वकील योगेश शहा यांनी सभा कामकाज कायदेशीर व केंद्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे झालेले आहे, असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष रंजना तवटे यांनी सर्व सभासद, सेवक, संचालक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.

Back to top button