पोषण आहार मधून विद्यार्थ्यांना मिळणार इम्युनिटी बूस्टर! - पुढारी

पोषण आहार मधून विद्यार्थ्यांना मिळणार इम्युनिटी बूस्टर!

कोल्हापूर; प्रवीण मस्के : यंदाच्या वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार बरोबरच बूस्टर डोस दिला जाणार आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन या कडधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार केलेली वडी (स्लाईस) विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 16 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शिजवलेला आहार दिला जातो. कोरोना काळात शाळा बंद असल्याने कडधान्य घरपोच देण्यात आले. नियमित माध्यान्ह भोजन याबरोबरच शासनाकडून विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. यंदा 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहारात पाच प्रकारच्या वड्या दिल्या जाणार आहेत.

ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन या कडधान्यांवर प्रक्रिया करून या वड्या तयार केल्या जाणार आहेत. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पोषणमूल्य युक्त न्युट्रीटिव्ह स्लाईस (वड्या) उपलब्ध करुन देण्याकरिता पुणे शिक्षण संचालनालय स्तरावरून ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासंदर्भात पुरवठादार ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. पात्र विद्यार्थ्यांची पटसंख्येची माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच याचे वाटप केले जाणार आहे.

ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन कडधान्ये शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. ज्वारीमध्ये कॅशिल्यम अधिक असतात, यामुळे पचनक्षमता सुधारते. सोयाबीन, नाचणी, तांदळाच्या वड्या आरोग्यासाठी उत्तम प्रतीची म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी हे उपयोगी ठरू शकतात, असे आहार तज्ञांचे मत आहे.

शालेय पोषाण आहारात दिल्या जाणार्‍या पाच प्रकारच्या वड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या वाढीवर चांगला परिणाम होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची प्रतिकारक क्षमता वाढून त्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासात मदत होईल.
– आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.

Back to top button