अंबाबाई मंदिरात बॉम्ब : मद्यपी जावयाच्या कृत्यामुळे सासर्‍याची कोठडीपर्यंत वरात | पुढारी

अंबाबाई मंदिरात बॉम्ब : मद्यपी जावयाच्या कृत्यामुळे सासर्‍याची कोठडीपर्यंत वरात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याची आवई उठवून नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा, शेकडो भाविक, कर्मचार्‍यांची तारांबळ उडवून देणार्‍या जावयासह सासर्‍याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी सकाळी मुसक्या आवळल्या. बाळासाहेब शामराव कुरणे (वय 60, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) व सूरज गौतम लोंढे (33, बागणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. दारूच्या नशेत जावयाने केलेल्या करामतीमुळे सासर्‍यालाही थेट कोठडीचा रस्ता धरावा लागला आहे.

कोरोनामुळे बंद असलेल्या अंबाबाई मंदिराचा दरवाजा नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी उघडल्याने गुरुवारी भाविकांची गर्दी होती. सोशल डिस्टन्स, कोरोना नियमावलीसाठी यंत्रणा कार्यरत असतानाच सायंकाळी मदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून येथील पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. क्षणार्धात सारा नूर पालटला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. तपासणीअंती ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्याचा असा लावला छडा

अफवा पसरवून घबराट आणि गोंधळ माजवणार्‍यांचा छडा लावण्याच्या सूचना बलकवडे यांनी पथकांना दिल्या. मोबाईल क्रमांकाद्वारे मोबाईलधारकाचे नाव, लोकेशन, पत्ता शोधण्यात आला. त्यात वाळवा तालुक्यातून बॉम्बची अफवा पसरवणारा कॉल झाल्याचे उघड झाले.
मोबाईलधारक कुरणेला पहाटे ताब्यात घेण्यात आले. चौकशीत जावई लोंढे याचेही नाव निष्पन्न झाले. गुरुवारी दुपारी दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या जावयाने सासर्‍याकडून मोबाईल घेतला आणि थेट गोवा पोलिसांशी संपर्क साधून अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचे सांगून मोबाईल स्वीच ऑफ केला.

लोटांगण घालत कृत्याची कबुली

गोवा पोलिसांनी कोल्हापूर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. तासभर थरारनाट्य घडले. मात्र ही अफवाच ठरली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी जावयाने लोटांगण घालत कृत्याची कबुली दिली.

Back to top button