कोल्हापूर नवरात्रौत्सव : व्यापारीच टार्गेट का? | पुढारी

कोल्हापूर नवरात्रौत्सव : व्यापारीच टार्गेट का?

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

कोल्हापूर नवरात्रौत्सव 

संकट काळात प्रशासन व्यापार्‍यांकडे मदतीचे आवाहन करते. अनेक व्यापारी सढळ हाताने मदत करतात; पण याच व्यापार्‍यांवर सध्या प्रशासनाची वक्रद़ृष्टी पडली आहे. कोरोना काळात दुकाने सुरू करण्यावरून जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद झाला. आता नवरात्रौत्सवात रस्ते बंद केल्याने पुन्हा पोलिस व व्यापारी यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले. कोरोनामुळे अगोदरच व्यापार्‍यांसमोर संकटाचा डोंगर उभा आहे. त्यात प्रशासनाच्या नियमांचा फटका व्यापारीवर्गाला बसत आहे. व्यापारीच टार्गेट का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून व्यापार-उद्येाग बंद होता. जेव्हा कोरोना रुग्णसंख्या कमी झाली, तेव्हा तर दुकाने सुरू करण्यासाठी व्यापारीवर्गाला रस्त्यावर उतरावे लागले. आता कुठे नियमात शिथिलता मिळाल्याने व्यापारीवर्गाला दिलासा मिळाला होता. दसरा, दिवाळीत खरेदी झाली तर व्यापार्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. विशेषत:, अंबाबाईदेवीच्या दर्शनानिमित्त लाखो भाविक कोल्हापूरला भेट देतात. यातून पर्यटकांची संख्या वाढते. व्यापार-व्यवसायात वृद्धी होते; पण हा व्यवसाय करण्यासाठी ग्राहकच दुकानापर्यंत पोहोचू नयेत, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. अंबाबाई दर्शनाच्या निमित्ताने येणार्‍या भाविकांमुळे सराफ बाजारपेठ, महाद्वार रोडवरील व्यापाराला काहीशी चालना मिळते; पण सुरक्षेच्या नावाखाली ते रस्तेही बॅरिकेडस् लावून बंद केल्याने व्यापारीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केलेच पाहिजे; पण हे उपायच स्थानिकांसाठी त्रासादायक ठरत असतील, तर त्याचा गांभीर्याने फेरविचार करण्याची गरज आहे.

…असे होते का पर्यटकांचे स्वागत? ( कोल्हापूर नवरात्रौत्सव )

नुकताच जिल्हा प्रशासनाने पर्यटन महोत्सव साजरा केला. अन्य राज्यांतील पर्यटक आल्याने कोल्हापूरच्या व्यापार-व्यवसायाला चालना मिळेल, असे उपक्रम राबवणार असल्याचे सांगण्यात आले. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढू लागली; पण मंदिर परिसरातील व्यापार-उद्योगवाढीला चालना मिळण्याऐवजी दुकाने बंद होण्याची वेळ आली. बॅरिकेडस् लावल्याने भाविकांना दुकानांपर्यंत पोहोचता येत नाही. काहींना रस्ते माहीत नाहीत. त्यामुळे व्यापारीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.

Back to top button