कोल्हापूर नवदुर्गा दर्शन : नवदुर्गातील षष्ठदुर्गा श्री महाकाली देवी - पुढारी

कोल्हापूर नवदुर्गा दर्शन : नवदुर्गातील षष्ठदुर्गा श्री महाकाली देवी

फुलेवाडी : शिवराज सावंत

कोल्हापूर नवदुर्गा दर्शन

जेव्हा असुरांनी संहाराचा अतिरेक केला, सर्व देव नामोहरण झाले तेव्हा देवांनी शक्तीची आराधना केली. या आवाहनातून दुर्गा प्रकटली. या दुर्गेने असुरांचा नायनाट केला आणि देवांना व मानवाला अभय दिले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या नवदुर्गात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला असुरांच्या विरुद्ध युद्धात मदत करणार्‍या देवतांमध्ये महाकाली देवी अग्रभागी होती.

महाकाली देवीचे मंदिर करवीरनगरीत शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर परिसरात आहे. ही देवी तामसगुणाची असल्याने आद्यशक्ती, विषवरूपी, रौद्ररूपी आहे. सृष्टीच्या आरंभी शेषावर योग निद्रिस्त असणार्‍या भगवान विष्णू देवाच्या कर्णातून उत्पन्न झालेल्या मधू-कैटभ राक्षसाच्या संहारासाठी ब—ह्मदेवाने महाकालीची करुणा भाकली तेव्हा विष्णूच्या शरीरातून तेजरूपाने महाकाली शक्ती ब—ह्मदेवासमोर येऊन उभी ठाकली आणि विष्णूकरवी या दैत्याचा संहार केला. ( कोल्हापूर नवदुर्गा दर्शन )

श्री महाकाली मंदिरातील ही देवता तीन हात उंचीच्या काळ्या पाषाणाची सर्वांगसुंदर मूर्ती आहे. प्राचीनकाळी अगस्ती आणि लोपामुद्राने या देवतेची पूजा करून आशीर्वाद घेतल्याचे करवीर माहात्म्य ग्रंथात उल्लेख आहे. प्राचीनकाळी या मंदिरासमोर असणार्‍या अमृत कुंडातून मयुरी नदी उगम पावते असा उल्लेख आहे. देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस पाच फणाची नागमूर्ती आहे, तर डाव्या बाजूस एक फणाचा नाग आहे. परिसरात महाकाली तीर्थ आहे. या कुंडात स्नानाने प्राणिमात्र कैलासास जातो, असा उल्लेख करवीर माहात्म्यात आढळतो. मंदिर परिसरात विषकुंड, महाकाळ कुंडाचे उल्लेखदेखील आहेत.

Back to top button