Electric bike : कोल्हापूरकर इलेक्ट्रिक बाईकच्या प्रेमात! | पुढारी

Electric bike : कोल्हापूरकर इलेक्ट्रिक बाईकच्या प्रेमात!

कोल्हापूर, तानाजी खोत : कोरोना साथ काळात बसलेल्या धक्क्यातून वाहन उद्योग सावरला असून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मावळत्या (2022 ते 2023) आर्थिक वर्षात 74 हजार नवी वाहने नोंदवली गेली आहेत. त्यातील 55 हजार दुचाकी असून एकूणात 73 टक्के प्रमाण दुचाकींचे आहे.

2022 ते 2023 या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 15 हजार अधिक वाहने विकली गेली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ यामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला असून विकलेल्या एकूण दुचाकींपैकी 20 टक्के म्हणजे 11 हजार इलेक्ट्रिक बाईक आहेत. पुढच्या वर्षात इलेक्ट्रिक बाईक्सचा टक्का वाढून ती वाहने एकूण विकलेल्या दुचाकींच्या 30 टक्के होण्याचा वाहन उद्योगातील जाणकारांचा अंदाज आहे. एकाच वर्षात ई-बाईकच्या विक्रीत चौपट वाढ झाली आहे.

वाढत्या प्रदूषणाचा विचार करून सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिीक वाहनांचे प्रमाण यापेक्षा अधिक वाढण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे, तरीही पेट्रोल, डिझेलवरील वाहनांची मागणी चांगली आहे. वर्षात 44 हजार पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकी विकल्या गेल्या आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी कोल्हापुरात एकूण 16 लाख 53 हजार 754 वाहने होती. त्यात 74 हजार वाहनांची भर पडून ती 16 लाख 87 हजार 997 झाली आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता टक्का

इलेक्ट्रिक वाहने एकूण विक्री – 10,550
इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री- 10,340
एकूण वाहनांत प्रमाण- 20 टक्के (सुमारे)
2021-22 मधील ई-बाईक विक्री -2,599

Back to top button