प्रिया पाटील : शववाहिकेची सारथी ’दुर्गा’ | पुढारी

प्रिया पाटील : शववाहिकेची सारथी ’दुर्गा’

कोल्हापूर; गौरव डोंगरे : कोरोनाने मृत्यू म्हणजे चार हात लांब… कोरोनाबाधिताचा मृतदेह उचलण्यासाठी सहसा कोणी धजावत नाही… मृतदेहावर अंत्यसंस्काराला नातेवाईकही दुरापास्त… अशावेळी जाधववाडीतील दुर्गेने पुढाकार घेऊन शववाहिका चालक बनण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता 450 मृतदेहांवर अंत्यसंस्काराची कामगिरी जिने पार पाडली तिचे नाव प्रिया पाटील.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रिया पाटील हिला वडिलांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. तिचे वडील शिरोली एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला आहेत. आई मनीषा गृहिणी, मोठा भाऊ पवन सिव्हिल इंजिनिअर असून प्रिया विवेकानंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहे.

‘त्या’ प्रसंगाने व्यथित…

प्रियाच्या वडिलांच्या एका मित्राचा कोरोनाने मृत्यू झाला. दुपारी साडेचार वाजता मृत्यू होऊनही मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास मध्यरात्र उलटली. शववाहिका वेळेत न मिळणे, स्मशानभूमीतील वेटिंग, कर्मचार्‍यांची कमतरता अशी कारणे प्रियाच्याही कानावर आली. चारचाकी चालविण्याचा परवाना असणार्‍या प्रियाने स्वत: शववाहिकेवर चालक म्हणून जाण्याचे ठरवले.

संधीचा शोध…

प्रियाकडे चारचाकीचा परवाना होता. तिने शववाहिकेवर चालक म्हणून कामाची संधी मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्जही सादर केले होते. पण, तिला प्रतिसाद मिळाला नाही. भवानी फाऊंडेशनचे हर्षल सुर्वे यांनी कोरोना मृतांसाठी मोफत शववाहिका देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच प्रियाने त्यांच्याशी संपर्क साधून ही सुरुवात केली.

प्रियाच्या या कामात आई, वडील, भाऊ, नातेवाईक, मित्र परिवाराकडून प्रोत्साहन मिळत आहे. भवानी फाऊंडेशनचे हर्षल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, प्रदीप हांडे, राकेश सावंत या सहकार्‍यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे प्रिया आवर्जून सांगते.

मन विचलित करणारा प्रसंग…

शववाहिकेवर चालक व्हायचे ठरवून प्रिया फिल्डवर आलीही. सीपीआर रुग्णालयात आल्यानंतर पहिल्यांदाच मृतदेह उचलताना ती थोडी विचलित झाली, घाबरली; पण धाडसाने तिने हे काम केले. मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडल्यानंतर प्रियाला स्वत:च्या कामाचा अभिमानही वाटला.

Back to top button