जागतिक रंगभूमी दिन : मराठी नाटक कधी घेणार जागतिक भरारी!
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विल्यम शेक्सपियर, आर्थर मिलर, बेन जॉन्सन यांच्यासह परदेशातील अनेक दिग्गज लेखकांची नाटके मराठीत अनुवादित होऊन रंगमंचावर येत आहेत. या उलट मराठीतील कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, राम गणेश गडकरी यांची नाटके तुलनेने तितकीच दर्जेदार आहेत. जागतिक रंगभूमी दिन साजरा होत आहे. या निमित्ताने मराठी नाटक ही इंग्रजी, फे्ंरच अशा विविध भाषांत अनुवादित करून जागतिक रंगमंचावर सादर करण्याचे आव्हान नव्या पिढीसमोर आहे.
अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव "थिएटर ऑफ नेशन" या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. 27 मार्च 1961 ते 27 मार्च 1962 या कालावधीत एकूण 85 देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे 27 मार्च 1962 पासून युनेस्कोने हाच दिवस "जागतिक रंगभूमी दिन" म्हणून साजरा होत आहे. आज 'थिएटर ऑफ नेशन' या संकल्पनेशी जगातील 90 देश जोडले गेले आहेत.
शेक्सपियरने 'जग ही एक रंगभूमी आहे' असे म्हटलेले आहे, तर रंगभूमीवरून जगाकडे बघण्याचा द़ृष्टिकोन थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेने दिला. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकास नाट्यसृष्टी आतून व बाहेरून पाहता येते. त्यामुळे नाट्याविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाटक या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्त्विक चिंतन आहे.
भारतीय चित्रपटसृष्टी कोल्हापूरमधून उदयास आली. तसेच रंगभूमीवर कलावंतांच्या कलेचे पहिले सादरीकरण कोल्हापूरजवळील सांगली या शहरात झाल्याचे स्पष्ट होते. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाचे सादरीकरण सांगलीत 1843 मध्ये सादर केल्याची नोंद इतिहासात आहे.
महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केल्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मात्र, महात्मा फुले यांनी पहिले नाटक लिहिले होते. महात्मा फुले यांनी तृतीय रत्नाकर नावाचे नाटक 1855 मध्ये लिहिले होते. मात्र, बि—टिशांनी या नाटकाच्या प्रयोगाला परवानगीच दिली नाही. त्यामुळे त्यांचे हे नाटक प्रयोगाविनाच पडून होते. त्यानंतर मात्र मराठी रंगभूमीचा विकास होत गेला. आता तर व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांसहीत चित्रपटांचा भरणा झाला आहे.
मराठी नाटक परदेशी भाषेत अनुवादित होण्याची गरज
जागतिक रंगभूमी दिन साजरा होत असतानाच एकूणच भारतीय आणि मराठी नाट्यपरंपरेविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मीची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे. टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाईल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. काही मोजक्याच नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी नाटकांच्याही कक्षा रुंदावण्याची गरज आहे. परदेशातील रंगकर्मींना मराठी लेखकांचे नाटक काय आहे, हे सांगण्यासाठी मराठीतील नाटक परदेशी भाषेत अनुवादित करणे गरजेचे आहे.