नवरात्रौत्सव : चैतन्यदायी नवरात्रौत्सवास प्रारंभ; सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली | पुढारी

नवरात्रौत्सव : चैतन्यदायी नवरात्रौत्सवास प्रारंभ; सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सनई-चौघड्याचे मंगल सूर, धार्मिक मंत्रोच्चार, चैतन्यदायी व मंगलमय वातावरण आणि अंबा माता की जय…, असा अखंड गजर अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी नवरात्रौत्सवास ( नवरात्रौत्सव ) प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना करण्यात आली. यानंतर तोफेच्या सलामीने शारदीय नवरात्रौत्सवास ( नवरात्रौत्सव ) प्रारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर शहर व जिल्ह्यातील विविध देव-देवतांच्या मंदिरांत आणि घरोघरी नवरात्रौत्सवांतर्गत ( नवरात्रौत्सव ) घटस्थापना झाली. कोरोनाच्या संकटातून सर्वांची मुक्ती करण्याची प्रार्थना भाविकांनी केली.

तत्पूर्वी, पहाटे 5 वाजता प्रवेशद्वारावरील कुलूप काढून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी कुलूप काढून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला. ‘ई-दर्शन’ बुकिंग पास काढलेले परराज्यांतील भाविक आदल्या दिवशीपासूनच कोल्हापुरात दाखल झाले होते. ई-पासवर दिलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदरच भाविक येत होते. राज्य सरकारने नवरात्रौत्सवानिमित्त सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवारी सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली.

गुरुवारी पहाटेपासूनच मंदिरात घंटानाद करून विविध धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते आरती व घटस्थापना करण्यात आली. यानंतर 11 वाजता अभिषेकानंतर दुपारच्या सत्रात पूजा बांधण्यास सुरुवात
झाली.

राजू शेट्टींनी घेतले दर्शन ( नवरात्रौत्सव )

दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दुपारी अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी सकाळी संयोगीताराजे व मधुरिमाराजे यांनीही दर्शन घेतले.

ऊन-पावसाच्या वातावरणात दर्शन ( नवरात्रौत्सव )

दिवसभर वातावरणात उष्मा होता. दुपारी ढग दाठूण आल्याने उष्म्यात वाढ झाली. यामुळे दुपारी तासभर पाऊस पडला. यानंतर काहीकाळ पाऊस थांबला होता. सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाची सुरुवात झाली. दिड दोन तास अखंड पाऊस बरसतच होता. अशा ऊन-पावसातच भावीकांना देवीचे दर्शन घ्यावे लागले. अचानक पडणार्‍या पावसामुळे भावीकांसह यंत्रणेचीही तारांबळ उडाली होती.

शांतपणे दर्शन झाल्याबद्दल भाविकातून समाधान ( नवरात्रौत्सव )

दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदीरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे देवीचे दर्शन व्यवस्थीत घेता येत नाही. गर्दी, गोंधळ व गडबड-घाईमुळे अनेकांना देवीची मूर्तीही दिसत नाही. याउलट यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या दर्शन रांगेतून शांतपणे दर्शन घेता आले, याबद्दल समाधानाच्या भावना भाविकातून व्यक्त करण्यात आल्या.

Back to top button