गोकुळ ची आघाडी जिल्हा बँकेत राखण्याचे आव्हान | पुढारी

गोकुळ ची आघाडी जिल्हा बँकेत राखण्याचे आव्हान

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही बाजूला पक्षीय परिघाबाहेर आघाडी झाल्या. त्यानंतर ‘गोकुळ’चे प्रतिध्वनी जिल्हा परिषदेत उमठून तिथेही सत्तांतर झाले. लांबलेली जिल्हा बँकेची निवडणूक आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपास्त्रांनी घायाळ झालेली राष्ट्रवादी यामुळे जिल्ह्यात विरोधी आघाडीला जीवदान मिळाले. बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघातील आघाडी कायम राखण्याने दोन्ही बाजूला आव्हान असणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक अशी नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ निमित्ताने दोन गटात कोल्हापूरचे राजकारण विभागले होते. काँग्रेस आणि शिवसेना गोकुळ निमित्ताने दोन गटात विभागली. राष्ट्रवादी तत्कालीन विरोधी आघाडीत तर भाजप सत्ताधारी सोबत एकसंघपणे राहिली. गोकुळच्या सत्तांतरानंतर जिल्ह्याच्या राजकारणानेही कूस बदलली. पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. पी. एन.पाटील यांच्यातील दरी रुंदावणार असल्याची चर्चा असतानाच जिल्हा परिषद अध्यक्षपदी पी. एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील यांच्या निवडीने एकादमात काँग्रेसमधील गटबाजी संपल्याचा संदेश गेला. पी. एन. पाटील यांची राजकीय दिशा स्पष्ट असल्याने जिल्हा बँकेत विरोधी आघाडीचा कणा मोडल्यासारखी स्थिती झाली होती. गेल्या 30 वर्षापासून गोकुळ दूध संघाची सत्तासुत्रे एकत्रपणे चालविणारे आ. पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या बँकेच्या राजकारणातील भूमीकेबाबत जिल्ह्याचे लक्ष आहे…

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एका मागून एक घोटाळ्याचे आरोप केल्याने आक्रमक राष्ट्रवादी काहीशी बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेत विरोधकांची ताकदीने मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेत संचालकपदासाठी शिवसेनेत मोठी स्पर्धा लागली आहे. खा. संजय मंडलिक, माजी खासदार निवेदीता माने या विद्यमान संचालकांचा दावा कायम असून आ. प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रत्येकी एका जागेची मागणी आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सर्वपक्षीयांनी घेरल्याने त्यांची भूमीका लक्षवेधी ठरली आहे. आ. विनय कोरे यांनी गोकुळच्या राजकारणात महत्वाची भूमीका बजावत मुश्रीफ-सतेज पाटील गटाला साथ दिली होती. जिल्हा बँकेत मात्र आ. कोरे हे तीन जागांवर ठाम आहेत. चर्चेतून तिढा सुटला नाही तर आ.विनय कोरे हे विरोधी आघाडीचे शिलेदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलेल्या राजकारणामुळे वरवर सहज वाटणारी जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे.

संदर्भ बदलण्याची शक्यता

मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या निमित्ताने बांधलेली मोट जिल्हा बँकेत कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. गोकुळ दूध संघातील भक्कम आघाडी कायम असल्याचे संकेत देत भाजप आणि महाडिक गटाला ताकदीने रणांगणात उतरावे लागणार आहे. संस्था गटात मोठी ताकद असलेले आ. पी.एन. पाटील हे जिल्हा बँकेत सत्ता आघाडीसोबत असतील. तर तीन जागांची मागणी अमान्य झाल्यास आ. विनय कोरे विरोधी आघाडीला बळ देण्याची शक्यता आहे.

Back to top button