भुयारी मार्ग : सांगली फाटा-पंचगंगा पूल मार्गावर १३ भुयारे बांधणार | पुढारी

भुयारी मार्ग : सांगली फाटा-पंचगंगा पूल मार्गावर १३ भुयारे बांधणार

कोल्हापूर : सुनील सकटे

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गातील सातारा ते कागल या रस्त्याच्या सहापदरीकरणासह महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर महापुराचे पाणी अडणार्‍या सांगली फाटा ते पंचगंगा पूल या मार्गात तब्बल 13 भुयारी मार्ग करण्याचे नियोजन असल्याने महामार्ग महापूरमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापुराचे पाणी आल्याने गेल्या तीन वर्षांत दोनवेळा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुमारे आठवडाभर वाहतूक ठप्प होती. या मार्गात आठ ठिकाणी महापुराचे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सहापदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. दोन टप्प्यांत महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. पेठ ते शेंद्रे 67 कि.मी.साठी 1,895 कोटी, तर कागल ते पेठ या 63 कि.मी.साठी 1,502 कोटी असा एकूण 3,397 कोटींचा निधी मंजूर आहे.

महामार्गाची उंची वाढवणार ( भुयारी मार्ग )

शिरोली येथे महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उड्डाणपूल आणि नियमित रस्ता अशा दुहेरी वाहतुकीऐवजी आता एकाचवेळी उड्डाणपुलावरून ये-जा करणारी समांतर वाहतूक करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीवर सध्या एका पुलांवरून वाहतूक सुरू आहे. अरुंद रस्त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा विचार करून या ठिकाणी आणखी दोन मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.

तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सातार्‍यावरून कोल्हापुरात येणारी वाहने थेट या उड्डाणपुलावरून शहरात प्रवेश करणार आहेत. तर कोल्हापुरातून महामार्गावर जाण्यासाठी पंचगंगा नदीवर लोखंडी पुलाशेजारी नव्याने पूल बांधण्यात येणार असून, या पुलावरून शहरातून बाहेर जाणारी वाहने महामार्गावर मार्गस्थ करण्याचे नियोजन आहे. पंचगंगा पुलाची उंचीही साडेतीन मीटरने वाढविण्यात येणार आहे. तसेच पाणी येणार्‍या ठिकाणी महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे.

येथे होणार उड्डाणपूल ( भुयारी मार्ग )

नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी, अंबप फाटा, कणेगाव, येलूर फाटा, वाघवाडी, नेर्ले, शेणे-येवलेवाडी, कराड-मलकापूर, मसूर फाटा आणि नागठाणे या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहेत.

सेवामार्गांसह स्वच्छतागृहांची सोय ( भुयारी मार्ग )

नवीन प्रस्तावात सध्या ठिकठिकाणी अस्तित्वात नसणारे सेवामार्ग तयार केले जाणार आहेत. सेवामार्ग तयार केल्याने लहान वाहनांसह दुचाकीस्वारांना त्याचा लाभ होणार आहे. महामार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहेही उभारण्यात येणार आहेत.

भुयारी मार्गांमुळे होणार पुराच्या पाण्याचा निचरा..! ( भुयारी मार्ग )

सांगली फाटा ते पंचगंगा पूलदरम्यान महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात साठून राहते. महापुरास महामार्गाची भिंत जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी महामार्गाच्या भिंतीस 13 ठिकाणी सिमेंटचे भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. महापुराचे पाणी भुयारी मार्गातून पुढे प्रवाहित होणार असल्यामुळे महामार्गावर पाणी येण्याचा धोका संपणार आहे.

Back to top button