महापूर : कायमस्वरूपी तोडगा काढा; पूरग्रस्तांचे केंद्रीय पथकाला साकडे | पुढारी

महापूर : कायमस्वरूपी तोडगा काढा; पूरग्रस्तांचे केंद्रीय पथकाला साकडे

शिरोळ/कुरुंदवाड/नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा

जुलैमध्ये आलेला महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंगळवारी केंद्रीय पथकाने शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड या भागात पाहणी केली. भारतीय प्रशासन सेवेतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख रेवनिष कुमार (नवी दिल्ली) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील नदी बुडित क्षेत्रातील कुजलेला व ठिसल्या फुटलेल्या उसाबद्दलची माहिती शेतकर्‍यांकडून जाणून घेतली. पंचगंगा-कृष्णा नदीचे पात्र, सध्याची स्थिती, महापूूर पाणी पातळी, बुडित हेक्टरी क्षेत्र, पिके, पडलेली घरे याची पाहणी करून नुकसानभरपाई, पंचनामे यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, महापूर येऊन अडीच महिने ओलांडून गेल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीस आल्याने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे, सचिन शिंदे, प्रदीप चव्हाण या पदाधिकार्‍यांकडून पथकातील अधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ व अलार्म घड्याळ देऊन स्वागत करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी अटकाव करून वर्दीचा धाक दाखवत धक्काबुक्की केली. त्यानंतर स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी महसूल, कृषी आणि पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मंगळवारी सकाळी प्रथम शिरोळ येथील कुरुंदवाड जुन्या रोडवरवरील पंचगंगा काठावरील पाहणी केली. त्यानंतर कुरुंदवाड येथील बाळासाहेब गायकवाड, महेश जिवाजे या शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसान झालेल्या ऊस पिकाची माहिती घेतली. शेती, व्यावसायिक औद्योगिक व रहिवासी क्षेत्रातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांनी महापूर येऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली.

राजापूरच्या सरपंच सविता पाटील यांनी प्रत्येक वर्षी महापुरात राजापूर गाव पाण्याखाली जाते. त्यामुळे पावसाळ्यात 4 महिन्यासाठी टाकळीवाडी येथील गायरान जमिनीत तात्पुरते स्थलांतर करावे, अशी मागणी पथकाकडे केली. यावेळी कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पूरबाधित भागाची माहिती दिली. त्यानंतर पथकाने नृसिंहवाडीची पाहणी केली. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे, माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, प्रतीक धनवडे, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते, सागर धनवडे यांनी राज्य शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने जास्तीत जास्त निधी द्यावा. शिवाय महापूर येऊ नये म्हणून नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा, अशी भूमिका मांडली.

या पथकात जलशक्ती आयोगाचे सहायक अभियंता महेंद्र सहारे (नागपूर), ऊर्जा मंत्रालयाच्या उपसंचालिका पूजा जैन (नवी दिल्ली), रस्ते व वाहतूक महामार्ग अभियंता देवेंद्र चापेकर (मुंबई), उपजिल्हाधिकारी अजय पवार, तहसीलदार प्रशांत पिसाळ, विवेक जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावर, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, टीना गवळी, निखिल जाधव, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित होते.

कुरुंंदवाड येथे नगराध्यक्ष जयराम पाटील, मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे, बांधकाम अभियंता योगेश गुरव, तलाठी मीनाक्षी ढेरे, कोतवाल मनोहर कुलकर्णी, साताप्पा बागडी, बाबासाहेब पट्टेकरी, महेश जिवाजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

संतापाची लाट

या पाहणी दौर्‍यावेळी बहुतांशी ठिकाणी पोलिस व तालुका आणि जिल्हास्तरीय महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांची केंद्रीय पथकाबरोबर भेट होऊ दिली नाही. उलट व्यथा मांडण्यासाठी पुढे येणार्‍या शेतकर्‍याला मागे ढकलून गप्प करण्याचा प्रयत्न केला. नेमके हे पथक महसूल विभागाने केलेल्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी आले होते का, असा सवाल उपस्थित करीत तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

केंद्राने मदत द्यावी

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थ-नागरिक व शेतकर्‍यांनी शेती, जनावरे, राहते घर व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची माहिती पथकाला दिली. महापूर येऊन अडीच महिने झाले. अद्याप राज्य शासनाने पूर्णपणे मदत केली नाही. शिवाय आपले केंद्राचे पथक उशिरा आले आहे. आमचे मागणे केंद्र शासनापुढे मांडून आम्हाला केंद्राकडून मदत द्या, अशी मागणी केली.

Back to top button