अंबाबाईचे दर्शन ई-पासधारकांनाच; आजपासून ऑनलाईन बुकिंग | पुढारी

अंबाबाईचे दर्शन ई-पासधारकांनाच; आजपासून ऑनलाईन बुकिंग

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन साठी आवश्यक ई-पास काढण्यासाठी बुधवार, दि. 6 पासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. सकाळी अकरापासून त्याची लिंक भाविकांसाठी खुली होणार आहे. देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

नवरात्रौत्सवात श्री अंबाबाईचे दर्शन ई-पासद्वारे देण्याचा निर्णय देवस्थान व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार देवस्थान समितीच्या www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर दर्शन ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर दिवशी प्रत्येक तासाच्या कालावधीनुसार ई-पास मिळणार आहे. दि. 7 ते 13 ऑक्टोबर व दि. 15 या दिवशी पहाटे पाच ते रात्री नऊ तर दि. 14 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार आहे.

ई-पास स्कॅनिंग करून प्रवेश

भाविकांना मिळालेल्या ई-पासचे स्कॅनिंग करूनच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. शिवाजी चौक व एमएलजी हायस्कूल या दोन ठिकाणाहून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मोबाईलवर आलेला ई-पास अथवा त्याची प्रिंट दर्शन रांगेच्या प्रारंभी दाखवावी लागेल. त्यावरील क्यूआर कोड स्कॅन होईल आणि भाविकांना पुढे सोडले जाईल. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर त्या यादीतील नाव आपोआप रद्द होईल.

दर्शनरांगेच्या दोन्ही बाजूला 600 जणांचा बंदोबस्त

शिवाजी चौक आणि एमएलजी हायस्कूल या ठिकाणावरून अंबाबाई मंदिराकडे येणार्‍या दर्शनरांगेच्या दोन्ही बाजूला 300 होमगार्ड आणि पोलिस व 300 स्वयंसेवक अशा 600 जणांचा बंदोबस्त राहणार आहे. यामुळे दर्शन रांगेत कोणालाही शिरकाव करता येणार नाही. तपासणी केंद्रातून ई-पासचा क्यूआर कोड स्कॅनिंग केलेल्याच भाविकांना या रांगेत प्रवेश मिळणार आहे.

पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांग

शिवाजी चौक आणि एमएलजी हायस्कूल या दोन्ही ठिकाणाहून सुरू होणार्‍या दर्शनरांगेत पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांग असेल. शिवाजी चौकातून येणारी पुरुषांची रांग जोतिबा रोडवरून गाडगेबाबा पुतळा मार्गे सरलष्कर भवन समोरील मुख्य दर्शनरांगेला जावून मिळेल. महिलांची रांग भवानी मंडपातून पुढे जाऊन सरलष्कर भवनसमोरील मुख्य दर्शन रांगेला जाऊन मिळेल.

वेळेपूर्वी अर्धा तास दर्शनरांगेत येणे आवश्यक

भाविकांना दर्शनाची एकेक तासाची वेळ मिळणार आहे. ज्या तासाची वेळ आहे, त्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी भाविकांना दर्शनरांगेच्या तपासणी केंद्राजवळ उपस्थित राहावे लागणार आहे. दर्शनाची वेळ असेल त्याच कालावधीत भाविकांना सोडले जाणार आहे. वेळ उलटून गेली अथवा वेळेआधी दुसर्‍या स्लॉटमध्ये दर्शन रांगेत प्रवेश दिला जाणार नाही.

तपासणी केंद्राने 120 कर्मचार्‍यांची नियुक्ती

दोन्ही दर्शनरांगेच्या तपासणी केंद्रावर एकूण 120 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवस्थान समितीसह जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास आदी विभागाच्या कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही केंद्रावर प्रत्येकी सहा संगणकाद्वारे क्यूआर कोड स्कॅन केले जाणार आहे. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत.

एकाच वेळी चौघांची नोंदणी करता येणार

दर्शनासाठी ई-पास काढताना एका व्यक्तीला एका वेळी एकाच पासवर चौघांची नोंदणी करता येणार आहे. एका पासमध्ये जितक्या भाविकांची नोंदणी झाली आहे, ते सर्व जण एकाच वेळी उपस्थित असणे आवश्यक आहे. अन्यथा जे उपस्थित आहेत, त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

थर्मल स्क्रीनिंग सॅनिटायझरची व्यवस्था

दर्शनरांगेच्या तपासणी केंद्र जवळच चप्पल स्टँड उभारण्यात आले आहे. तसेच भाविकांना हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याच ठिकाणी भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे.

मंदिराचे दोनच दरवाजे राहतील खुले

नवरात्रौत्सव काळात अंबाबाईचे मंदिराचे दोनच दरवाजे खुले राहणार आहेत. सरलष्कर भवन समोरील पूर्व दरवाजातून दर्शन घेता येईल.

Back to top button