गोकुळ मध्ये दूध वाहतूक ठेक्याच्या ‘मलई’चा वाद रंगतदार वळणावर | पुढारी

गोकुळ मध्ये दूध वाहतूक ठेक्याच्या ‘मलई’चा वाद रंगतदार वळणावर

कोल्हापूर : संतोष पाटील

गोकुळ मध्ये सत्तांतरानंतर प्रथमच संचालक मंडळाला जिल्हांतर्गत दूध वाहतूक ठेका बदलाला संधी मिळाली. 425 पैकी 330 मार्गांवरील नव्या-जुन्या ठेकेदारांचे ‘मालक’ बदलले आहेत. वाहतुकीचा ठेका देताना विरोधकांना डावलल्याने तसेच एकाच तालुक्यात आघाडीचे दोनपेक्षा अधिक नेते असल्याने अंतर्गत धुसफुस वाढली आहे. वाहतूक ठेक्याच्या ‘मलई’चा वाद रंगतदार वळणावर आला आहे.

गोकुळ दूध संघात सत्तांतरानंतर पुणे-मुंबईतील जुन्या ठेकेदारांची साखळी तोडणे, प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थेत बदल, प्रशासकीय बदल्या, मुंबई-पुणे दूध वाहतुकीचा ठेक्याबाबत मोठे निर्णय झाले. सध्या संघाचा सर्व कंट्रोल पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातात आहे. पूर्वीप्रमाणेच संघातील सर्व लहान-मोठे निर्णय नेत्यांच्या विचारानेच होतात. निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग नसल्याने लक्ष्मी दर्शनासाठी नवीन कारभारी मंडळी अस्वस्थ झाली होती. जिल्ह्यातील 425 मार्गांवरील वाहन ठेका बदलाचे अधिकार संचालक मंडळाला मिळाल्याने नव्या कारभार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि कागल तालुक्यातील मिळून 97 वाहतुकीचे ठेके अद्याप बदलणे बाकी आहेत. इतर 330 मार्गांवर 1 ऑक्टोबरपासून नव्या-जुन्या गाड्या धावत असल्या, तरी त्यांचे ‘गोकुळ’मधील गॉडफादर बदलले आहेत. मागील वर्षी 44 कोटी लिटर दुधाच्या वाहतुकीसाठी 34 कोटी रुपये वाहनधारकांना दिले होते. महिन्याला सरासरी दोन कोटी 80 लाख रुपये वाहनधारकांना दिले गेले. वाहतुकीच्या ठेक्यातून पैसे मिळवण्याचा प्रत्येक संचालकाचा हेतू नसला, तरी तालुक्यातील दूध संस्थांशी संपर्क वाढण्यासह कार्यकर्त्यांना यातून काम देण्याचाही अनेकांचा प्रयत्न आहे. सत्ताधारी आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संचालक आहेत. एका तालुक्यात दोन-तीन संचालक असल्याने दूध वाहतुकीच्या ठेक्यावरून वाद सुरू आहे. एक वगळता तीन विरोधी संचालकांना एकाही मार्गावरील ठेका मिळालेला नाही. त्यामुळे वाहतूक ठेक्यावरून ‘गोकुळ’चे राजकारण तापणार आहे.

जिल्ह्यातील दूध वाहतुकीचे अनेक मार्गांवरील ठेके 1 ऑक्टोबरपासून बदलल्याचे समजले. अनेक वाहतूक ठेकेदारांना संघाकडून अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. संघाचा कारभार पारदर्शी होण्यासह ग्राहक आणि शेतकरी हितासाठी दूध वाहतुकीची जबाबदारी लेखी स्वरूपात निश्‍चित होणे गरजेचे असल्याचे संचालक चेतन नरके यांनी स्पष्ट केले.

ठेक्याबाबत प्रश्‍न

गाडीचा विमा, अन्‍न आणि औषध प्रशासन परवाना असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची तपासणी आणि कागदपत्रांची शहानिशा संघाने केली काय? असे असेल तर लेखी आदेश नसतानाही वाहनातून दूध वाहतुकीनंतर भेसळ झाली, अपघात झाला तर जबाबदारी कोणाची? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

Back to top button