‘तपोवन’वर तरुणाईची स्वच्छता मोहीम | पुढारी

‘तपोवन’वर तरुणाईची स्वच्छता मोहीम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा तपोवनभूमी महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, संत गाडगे महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. आजच्या तरुण पिढीने हा गांधी विचारांचा वारसा पुढे जतन करून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विद्यापीठ सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड. धनंजय पठाडे यांनी केले.

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन हायस्कूल येथील महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चरखा आश्रम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. पठाडे यांनी तपोवनभूमीचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, तुकडोजी महाराज, बाबा मेहेर, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, लता मंगेशकर यांच्या कुटुंबांतील सदस्य, अनेक अभिनेते येथे येऊन गेले. काहीजण वसतिगृहात राहून शिक्षण घेत मोठ्या पदावर गेल्याचे त्यांनी सांगितले.

दै.‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील म्हणाले, महात्मा गांधी यांचा पावन स्पर्श लाभलेली भूमी आहे. या ठिकाणी पाऊल ठेवणे हे भाग्य आहे.

महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी त्यांची अहिंसा चळवळ, सत्याग्रह आदी गोष्टींचा तरुणाईने अभ्यास करावा, तेव्हाच त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. अभय जायभाये म्हणाले, महात्मा गांधी यांनी तरुणांवर श्रमाचे संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एनएसएस’ सुरू झाले. महात्मा गांधी यांचा स्पर्श झालेल्या भूमीत ‘एनएसएस’ स्वयंसेवकांना श्रम करण्याची संधी मिळाल्याने राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश सफल झाला आहे.

दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक (पुरवणी) श्रीराम पचिंद्रे म्हणाले, तपोवनभूमीचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेत मोठी शिखरे पादाक्रांत केली आहेत.

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनचे विक्रम रेपे यांनी स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. आदिनाथ कांबळे यांनी आभार मानले. यावेळी शिलादेवी डी. डी. शिंदे सरकार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा कशाळकर, रविदास पाडवी, प्रा. सचिन धुर्वे यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.

विविध महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वच्छता मोहिमेत विवेकानंद महाविद्यालय, महावीर कॉलेज, कमला कॉलेज, केएमसी कॉलेज, गोखले कॉलेज, राजाराम महाविद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा, भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज, सायबर महिला विद्यालयासह नेहरू युवा केंद्र, महानगरपालिका आरोग्य विभाग वॉर्ड-ए (2)चे कर्मचारी यांच्यासह सुमारे 100 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Back to top button