कोल्हापूर : अंबाबाई मंदिराभोवतीच्या जागा संपादनाच्या हालचाली | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराभोवतीच्या जागा संपादनाच्या हालचाली

कोल्हापूर, अनिल देशमुख : अंबाबाई मंदिराच्या सभोवतालच्या किती मालमत्ता ताब्यात मिळतील, याची चाचपणी देवस्थान समितीने सुरू केली आहे. भविष्यकाळातील भूसंपादनाच्या या हालचाली असल्याचे मानले जाते. सुरुवातीला किती लोक आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतात, याचा अंदाज देवस्थान समितीला येईल. त्यानंतर सरकारी पातळीवरून पुढील कार्यवाही सुरू होईल, ती भूसंपादनाची असेल. सुमारे 200 मालमत्ताधारकांना आजअखेर पत्रे देण्यात आली असून, ही प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरासभोवतालच्या किती मालमत्ता तडजोडीच्या मार्गाने आपल्याला मिळू शकतात, यासाठी ही प्रक्रिया सुरू केली. यामध्ये बिनखांबी गणेश मंदिरापासून ते जोतिबा रोड कॉर्नर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, महालक्ष्मी बँक रोड आदी परिसराचा समावेश आहे.

नजीकच्या काळात हे तीर्थक्षेत्र धार्मिक पर्यटनासाठी विकसित होणे आवश्यक आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांचा ओघ पाहता, त्यांना उत्तमोत्तम सुविधा पुरवणे हे देवस्थान समितीचे कर्तव्य असले, तरी त्या पुरविण्यात देवस्थान समितीला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सर्वात मोठी अडचण जागेची आहे.

मंदिरात अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतींच्या आत जेवढी जागा उपलब्ध आहे, तेवढीच जागा देवस्थान समितीची आहे. याशिवाय देवस्थान समितीकडे मंदिर परिसरात कोणतीही जागा नाही. ही अडचण लक्षात घेऊन भाविकांना सुविधा देण्यासाठी जोतिबा रोड, महाद्वार रोड, वीर सावरकर रोड या रस्त्यांच्या आतील सर्व मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे देवस्थान समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

या कामाला आपले सहकार्य अपेक्षित असून, देवस्थान समिती शासकीय नियमानुसार भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे राबविणार आहे. मालमत्तेचे मूल्य निश्चित करून त्याचा जास्तीत जास्त मोबदला एकरकमी आणि रोख स्वरूपात देण्याची तयारी देवस्थान समितीने या पत्रात दाखवली आहे.

ज्या दोनशे मालमत्ताधारकांना ही पत्रे देण्यात आली आहेत, त्यांना येत्या दि. 2 मार्चपर्यंत लेखी समंती देण्यास सांगण्यात आले आहे. नेमक्या किती मालमत्ता तडजोडीने ताब्यात घेणार आणि त्यासाठी किती पत्रे देणार, याची माहिती देवस्थान समितीने दिलेली नाही.
दरम्यान, देवस्थानच्या या पत्रामुळे मंदिरालगतच्या मालमत्ताधारकांत खळबळ उडाली आहे.

संमतीनंतर जागेचे होणार मूल्यांकन

या पत्रानुसार जे मिळकतधारक जागा देण्याबाबत संमती देतील, त्या लेखी संमती दिलेल्या संबंधित जागेचे मूल्यांकन केले जाणार आहे. मूल्यांकनानंतर भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

तडजोडीने एकरकमी आणि रोख रक्कम देणार

लेखी संमती आणि मूल्यांकन झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता समितीने या पत्राद्वारे वर्तवली आहे. भूसंपादन तडजोडीने केले जाणार असून, संबंधित मिळकतधारकाला एकरकमी आणि रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्याची समितीची तयारी आहे.

Back to top button