बदनामी करणार्‍या शिखंडीचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

बदनामी करणार्‍या शिखंडीचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : समोरून लढण्याची हिम्मत ज्यांच्यात नाही, असे शिखंडी कागल विधानसभा मतदारसंघात तयार झाले आहेत. दुसर्‍यांना पुढे करून खालच्या पातळीवरचे राजकारण करून आमची बदनामी करणार्‍यांचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल. आजपर्यंत आपण कधीही खालच्या पातळीवरील राजकारण केले नाही. येईल त्यांचे काम करत राहिलो. पण यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही तसेच कोरोना काळात नाबार्डच्या सूचनेनुसारच सर्व साखर कारखान्याचे शॉर्ट टर्म कर्ज आत्मनिर्भर धोरणानुसार लाँग टर्म करण्यात आल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

आपली व कुटुंबाची बदनामी करणारे आज जनतेसमोर आले आहेत. त्यांचा मी निषेध करतो, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्या यांनी बँकेच्या कारभाराची माहिती घेणे यामध्ये गैर काही नाही. बँकेच्या कारभाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझ्याबद्दल व कारखान्याला घेतलेल्या कर्जाबाबत आपण यापुर्वी खुलासा केला आहे. नातेवाईकांच्या अगर माझ्या नावावर व्यक्तीगत कर्ज घेतलेले नाही. घोरपडे कारखाना व ब्रिक्स कंपनीला कायदेशीर नियमानुसारच कर्ज दिले आहे. पुरेशा तारणावर अधिकार्‍यांच्या शिफारशी शिवाय कोणतेही कर्ज दिले जात नाही नाही. तपास यंत्रणानी चौकशी सुरू केली असेल तर सोमय्या यांनी येण्याची आवश्यकता काय? माझी बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केले असल्याचे यावरून दिसते.

छत्रपती शाहू कारखान्याला 46 वर्षे त्यावर 225 कोटीचे कर्ज आहे आणि 9 वर्षापुर्वी मी सुरू केलेल्या कारखान्यावर 275 कोटीचे कर्ज आहे. 46 वर्षानंतर कारखान्याला कर्ज घेण्याची आवश्यकताच नाही. घोरपडे कारखान्याचे व्हॅल्युएशन 460 कोटीचे आहे. त्यामुळे मालमत्ता विकून बँकेचे कर्ज दिले जाईल बँकेला कोणतीही तोशिष लागू देणार नाही. पण दुसर्‍याच्या डोळ्यातील मुसळ दिसणार्‍यांची सवय बरोबर नाही. खालच्या पातळीवर आपण कधीही त्यांच्यावर टीका केली नाही. मला बदनाम करण्याचे कारस्थान त्यांचेच आहे. सोमय्या यांच्यासारख्यांना उठवून ते बसवतात. असेही मुश्रीफ म्हणाले.

जिल्ह्यातील आणि शेजारील जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना बँक कर्ज देते शॉर्ट र्टम कर्ज केवळ घोरपडे साखर कारखान्याचेच लाँग टर्म केलेले नाही तर सर्व साखर कारखान्यांचे ते आत्मनिर्भर धोरणानुसार केले आहे. त्यामुळे सर्व कारखान्याची कर्ज 3 ते 4 टक्यापर्यंत आहे. गेल्या तीन महिन्यात साखर विक्री नाही. त्यामुळे कर्ज वाढत जाते. कारखाने चालणार नाहीत,नाबार्डच्या सूचने वरून केले आहे. चुकीचे केले नाही पण ही मंडळी समजून घेत नाही, घोरपडे कारखान्याला पाच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतले आहे. संचालकांनी बँकेच्या हितासाठी सर्व कारखाने बँकेला जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे घोरपडे कारखान्याचे व्यवहार सुरू केले. असेही मुश्रीफ म्हणाले.

गेल्या सात आठ वर्षामध्ये तोट्यात असलेली बँके 100 ते 150 कोटी नफ्यात आणली. एकही खाते एनपीएत नाही. यावरून बँकेचा अध्यक्ष म्हणून मुश्रीफ त्यांना खुपत असावेत. कोणत्याही शेतकर्‍याच्या ठेवीवर आपण पैसे काढल्याचे दाखविल्यास पाहिजे ते शिक्षा भोगावयास तयार आहे. शेतकर्‍यांचे नाव घेऊन जे आले होते ते कारखान्याचे कर्मचारी आणि कंत्राटदार होते. माझी बदनामी करण्यासाठी लोकांना बोलायला लावयाचे हा स्टंट कशासाठी? असा सवालही मुश्रीफ यांनी केला.
यावेळी संचालक ए. वाय. पाटील, निवेदिता माने, भेय्या माने, रणजितसिंह पाटील, श्रुतिका काटकर आदी उपस्थित होते.

विकलेल्या दूध संघावर 15 कोटीचे अनुदान

घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधी केले नाही. परंतू आता विरोधकांप्रमाणे आपण तयारी केली आहे. विक्री केलेल्या शाहू दूध संघावर समरजितसिंह घाटगे यांनी केंद्र शासनाच्या योजनेतून 15 कोटीचे अनुदान घेतले आहे. असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

Back to top button