कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस; ‘या’ ओलांडली सरासरी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस; ‘या’ ओलांडली सरासरी

कोल्हापूर; अनिल देशमुख : जुलै महिन्यात आजवरचा सर्वात मोठा महापूर येऊनही कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने सरासरीही गाठली नाही. सरासरीच्या 85 टक्केच पावसाची नोंद झाली. सात तालुक्यांत मात्र पावसाने सरासरी ओलांडली. दमदार पाऊस झाला नसला, तरी सर्व धरणांत समाधानकारक पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावरच्या पाणी संकटाची कसलीही चिंता नाही.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग पाच दिवस पाऊस झाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडणारा महापूर आला. यामुळे जुलै महिन्यातच पाऊस सरासरी गाठतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पूर ओसरत गेला तसा पावसानेही दडी मारली.

जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 1,733 मि.मी. पावसाची नोंद होते. याच कालावधीत या वर्षी 1,481 मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण 85 टक्के आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस बरसला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात होतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत या तालुक्यात एकूण 5 हजार 234 मि. मी. पाऊस होतो. यावर्षी एकूण 4,419 मि.मी. म्हणजेच 84 टक्केच पाऊस झाला.

गगनबावडा सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस

गगनबावडा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी गगनबावडा सर्कलमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गगनबावड्यात सरासरी 5,234 मि. मी. पाऊस होतो. यावर्षी तिथे 6 हजार मि. मी. पावसाची नोंद झाली.

सात तालुक्यांनी ओलांडली सरासरी

जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज व भुदरगड या सात तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. सर्वाधिक पाऊस कागलमध्ये सरासरीच्या (650.6 मि.मी.) 184 टक्के (1201 मि.मी.) इतका नोंदवला गेला. हातकंणगलेत 139 टक्के, शिरोळ 123 टक्के, शाहूवाडी 131 टक्के, करवीर 145 टक्केे, गडहिंग्लज 151 टक्के, तर भुदरगडमध्ये 125 टक्के पावसाची नोंद झाली.ra

Back to top button