कोल्हापूर : कारागृहांतील गैरकृत्यांना बसणार आळा | पुढारी

कोल्हापूर : कारागृहांतील गैरकृत्यांना बसणार आळा

कोल्हापूर, आशिष शिंदे : राज्यातील कारागृहांतील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करून गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे कारागृहामध्ये विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन काही कैदी मारामार्‍या, भांडणे, कारागृहातून पलायनाचा प्रयत्न तसेच गैरकृत्ये करतात. त्यामुळे कारागृहांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येते. कैद्यांच्या जीवितालाही धोका पोहोचू शकतो. अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी राज्यातील 34 कारागृहांमध्ये जनरेटर बसवण्यात येणार आहेत.

कारागृहांमध्ये सूयार्र्स्तापूर्वी कैद्यांना त्यांच्या बरॅकमध्ये बंद करण्यात येते. सूर्योदयानंतर बाहेर काढण्यात येते. या काळात बरॅकमध्ये पुरेसा प्रकाश असणे अत्यावश्यक असते. तो नसेल तर अनेक गैरप्रकार घडण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी गेली काही वर्षे कारागृहात डिझेल जनरेटर बसवण्याचा प्रस्ताव होता. तो आता प्रत्यक्षात येणार आहे.

कारागृहातील वीज पुरवठा खंडित झाल्यास तो सुरू ठेवण्यासाठी सध्या कोणतीही व्यवस्था नाही. यातून सुरक्षा व्यवस्थेला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तो होऊ नये यासाठी 34 कारागृहांत डिझेल जनरेटर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी 4 कोटी 23 लाख 60 हजार 600 रुपयांचे 30 केव्हीएचे 34 जनरेटर खरेदी केले जाणार आहेत. एका डिझेल जनरेटरची किंमत सुमारे 12 लाख 45 हजार 900 रुपये आहे.

Back to top button