कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 32 लाख 78 हजार 464 मतदारांचे फोटो आता सुंदर होणार आहेत. मतदार यादी तयार करणार्या संगणक प्रणालीकडून हे फोटो चांगल्या प्रतीचे नसल्याचे सांगितले आहे. यामुळे या मतदारांचा शोध घेऊन त्यांचे फोटो बदलण्यात येणार आहेत.
मतदार यादीत मतदारांचे रंगीत छायाचित्र वापरले जाते. मात्र, मतदानासाठी कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) फोटो असलेल्या मतदार यादीचा वापर केला जातो. रंगीत छायाचित्रासह मतदार यादीचा वापर करणे सध्यातरी आर्थिकद़ृष्ट्या न परवडणारे आहे. मात्र, रंगीत छायाचित्रांच्या कृष्णधवल प्रतीत संबंधित मतदारांचा चेहरा स्पष्टपणे ओळखणे शक्य होते. यामुळे बोगस मतदानालाही आळा घालणे काही प्रमाणात शक्य होत असल्याने मतदार यादीतील सर्व मतदारांचे फोटो चांगले येतील, याची दक्षता घेतली जात आहे.
मतदार यादी तयार करण्याचे काम ज्या संगणक प्रणालीवर केले जाते, त्या प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) यादीतील पुसट दिसणार्या आणि खराब फोटोची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, असे तब्बल 32 लाख 78 हजार 464 मतदारांचे फोटो आहेत. 'बीएलओ'मार्फत संबंधित मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना फोटो बदलण्याबाबत सांगण्यात येणार आहे. मतदार यादीतील सध्याच्या फोटोबाबत त्यांची काही अडचण नसल्यास, तोच फोटो कायम ठेवण्याची त्यांची इच्छा असल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल. ज्यांना फोटो बदलायचे आहेत, त्यांच्याकडून अर्ज स्वीकारून नवे छायाचित्र घेतले जाईल. त्याचा मतदार यादीत समावेश होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 13 हजार 711 मतदारांचे, तर वाशिम जिल्ह्यातील 20 हजार 150 मतदारांचे फोटो संगणक प्रणालीद़ृष्ट्या चांगले नाहीत. अन्य जिल्ह्यांत 20 हजारांपासून ते एक लाख 80 हजारांपर्यंतच्या मतदारांचे फोटो चांगल्या प्रतीचे नाहीत.
मतदार ओळखपत्रही आता स्मार्ट कार्ड स्वरूपात
मतदारांना देण्यात येणारे मतदार ओळखपत्रही आता स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जात आहे. त्याचा प्रारंभ जानेवारीत झाला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्डसारखेच कार्ड असून त्यात मतदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मतदार नोंदणी अधिकारी यांच्या माहितीसह मतदानाबाबतच्या सूचनाही आहेत. विशेष म्हणजे या ओळखपत्रावर क्यूआर कोड असेल. तो स्कॅन केल्यानंतर मतदाराची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.