कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्बलच्या कार्यकारिणी निवडणुकीत अध्यक्षपदी शीतल धनवडे, कार्याध्यक्षपदी दैनिक 'पुढारी'चे दिलीप भिसे तर उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर यांची निवड झाली. अत्यंत चुरशीने रविवारी 10 ते 4 वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. त्यात शीतल धनवडे 69 मते घेऊन विजयी झाले. अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या भारत चव्हाण (62 मते), सुखदेव गिरी (52), यशवंत लांडगे (38) मते मिळाली. कार्याध्यक्षपदाचे विजयी उमेदवार दिलीप भिसे यांना 117 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी जितेंद्र शिंदे यांना 101 मते मिळाली. उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर 118 मते घेऊन विजयी झाले. भूषण पाटील यांना 100 मते मिळाली. सचिवपदी बाबा खाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. शिवाजी जाधव, डॉ. अलोक जत्राटकर, उद्धव गोडसे यांनी काम पाहिले.