कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लसीकरणाची आज ‘महामोहीम’ - पुढारी

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लसीकरणाची आज ‘महामोहीम’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील 371 गावांत बुधवारी (दि. 29) लसीकरणाची ‘महामोहीम’ आयोजित करण्यात आली आहे. एकाच दिवसात 2 लाख 50 हजार जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेली लोकसंख्या 30 लाख 14 हजार 400 इतकी आहे. यापैकी 22 लाख 5 हजार 321 जणांनी पहिला डोस तर 9 लाख 10 हजार 891 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात उद्दिष्टांनुसार अद्याप 9 लाख 73 हजार 260 जणांनी पहिला डोसही घेतलेला नाही. या सर्वांचा पहिला डोस व्हावा, याकरिता बुधवारी महामोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूर शहरासह 371 गावे निश्चित केली आहेत.

या महामोहिमेसाठी आरोग्य विभागासह महसूल, महिला व बालविकास, शिक्षण विभाग, ग्रामविकास, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय व गृह विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. या विभागाचे ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी लसीकरण सत्राच्या ठिकाणी सोशल मोबिलायझेशन, डाटा एन्ट्री, जनजागृती इत्यादी कामामध्ये सहभागी होणार आहेत. बुधवारी होणार्‍या महामोहिमेत एकूण 10 हजार 700 कर्मचारी सहभाग घेणार आहेत. उद्या दिवसभरात 1 हजार 70 लसीकरणाची सत्रे होणार आहेत. प्रत्येक सत्राकरिता पाच कर्मचार्‍यांचे एक पथक तसेच पाच पथकाचे राखीव पथक नियुक्त करण्यात आले आहे. लसीकरण होणार्‍या गावात लसीकरणाच्या संख्येनिहाय बूथची संख्याही निश्चित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्याची यादी तयार करून संबंधितांत जनजागृती करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने संबंधिताला लसीकरण केंद्रांवर आणण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

आम्हाला तिसर्‍या लाटेचा त्रास नको!

लस घेतल्याने कोरोनापासून सुरक्षित राहता येत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामदक्षता समितीची कामगिरी महत्त्वपूर्ण राहणार आहे. तिसर्‍या लाटेचा गावाला त्रास नको असेल तर सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारीही या समित्यांची आहे. याखेरीज ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांनीही आपल्यामुळे सर्वांना त्रास नको, या भूमिकेतून लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे.

Back to top button