कोल्हापूर : महालक्ष्मी होमाने महासत्संग सांगता | पुढारी

कोल्हापूर : महालक्ष्मी होमाने महासत्संग सांगता

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  धुक्यासह हलक्या थंडीत एकवटलेले आबालवृद्ध भाविक आणि उगवतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने, मंत्रोच्चाराच्या साथीत तपोवन मैदानावर महालक्ष्मी होम झाला. आर्ट ऑफ लिव्हिंग भक्ती उत्सवांतर्गत मंगळवारच्या महासत्संगानंतर बुधवारी महालक्ष्मी होम धार्मिक वातावरणात पार पडला.

भक्ती उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर दक्षिण काशीतील करवीरनिवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा यांच्या प्रतिकृती लक्षवेधी होत्या. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात हा होम झाला.

महालक्ष्मी होम व इतर धार्मिक विधी करण्यासाठी बंगळूर आश्रमातील वेद विज्ञान महाविद्यापीठातील प्रशिक्षित मुरली आणि श्रीजित पंडित उपस्थित होते. होमास विश्वस्त प्रदीप खानविलकर, स्वामी प्रणवानंद, स्वामी संतोष, स्वामी सुहास, स्वामी आनंद वैशंपायन आदी उपस्थित होते. सत्संगात गौतम डबीर, राहुल नागवेकर, विनीत पाचपुरे यांनी भजन-गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
होमाला 15 हजारांहून अधिक साधक व भाविक उपस्थित होते. होम व प्रसाद वाटपानंतर दोनदिवसीय भक्ती उत्सवाची सांगता झाली. याचे नेटके संयोजन राजश्री भोसले-पाटील, डिंपल गजवानी, दिव्या चंदवानी, सुजाता इंगळे, अजय किल्लेदार, सचिन मुधाळे, अनिमा दहिभाते, गीतांजली चिन्ननावर, स्वप्निल हिडदुग्गी, लीना बावडेकर, गौतम डबीर, राहुल नागवेकर, विनीत पाचपुरे आदींनी केले. होमाच्या पूर्णाहूतीनंतर श्री श्री रविशंकर नांदेडकडे रवाना झाले.

Back to top button