कोल्हापूर : …तर कोल्हापूरच्या व्यापार, उद्योगाला चालना | पुढारी

कोल्हापूर : ...तर कोल्हापूरच्या व्यापार, उद्योगाला चालना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय अर्थसंकल्पातून थेट असे कोल्हापूरला काहीच मिळाले नाही; पण यावेळी रेल्वे, पर्यटन व विमान क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीमध्ये कोल्हापूरचा समावेश केल्यास व्यापार, उद्योग व पर्यटनवाढीला चालना मिळेल; पण यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचे बजेट सादर करताना विविध क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यांतर्गत 2 लाख 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानक विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. फ्लाय ओव्हरब्रिज तसेच परीख पुलाला पर्यायी ओव्हरब्रिजसाठी निधीची गरज आहे.

कोल्हापूर-मिरज ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. या मार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणी आहे. तसेच कोकण रेल्वेला जोडणारा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर आहे. यासाठी तत्काळ निधी उपलब्ध झाल्यास कोल्हापूरच्या उद्योगांना त्याचा फायदा होऊन गोवा व जयगड येथील बंदरे थेट कोल्हापूरशी जोडली जाणार आहेत. याशिवाय विमान क्षेत्रासाठीही तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर विमानतळावरून आता कोल्हापूर, मुंबई, हैदराबाद, बंगळूर अशा विमान फेर्‍या सुरू आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय फेर्‍यांसाठी कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी ही उपयुक्त ठरणार आहे. देशात नव्याने 50 विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

यात कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी स्वतंत्र अशा निधीची मागणी झाल्यास कोल्हापूर विमानतळाचा विकास झपाट्याने होणार आहे. पर्यटनाला चालना देणारी सर्वात मोठी घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी देशातील 50 ठिकाणांची निवड करण्यात येणार आहे. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात. याशिवाय पन्हाळा व जोतिबा यामुळे कोल्हापूरला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूरची या 50 ठिकाणांच्या यादीत निवड झाल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने बजेटमधून 50 पर्यटनस्थळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे जयेश ओसवाल यांनी सांगितले; तर रेल्वेसाठी करण्यात येणार्‍या तरतुदींतून कोल्हापूरला काही तरी निधी मिळालाच पाहिजे. निधीअभावी कामे रखडल्यास कोल्हापूरचा विकास खुंटणार आहे, असे आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.

Back to top button