कोल्हापूर : सरकारी ‘कोंबड्या’ही महागल्या | पुढारी

कोल्हापूर : सरकारी ‘कोंबड्या’ही महागल्या

कोल्हापूर, अनिल देशमुख : महागाईच्या झळा सरकारी कोंबड्यांनाही बसत आहेत. खाद्यासाठी लागणारा कच्चा माल, औषधे, वाहतूक आदीत दरवाढ झाल्याने सरकारी कोंबड्याही महागल्या आहेत. अंडी उत्पादनासाठी राज्य शासनाकडून 50 टक्के अनुदानावर वाटप केल्या जाणार्‍या कोंबड्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत (डीपीडीसी) एकात्मिक कुक्कुट विकास योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी 25 तलंगा आणि तीन नर कोंबडे अशा तलंगा गट व 100 एका दिवसाच्या पिलांचे गट लाभार्थ्यांना वाटप केले जातात.

सध्या उबवणीची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एका दिवसाची पिल्ली यांच्या किमतीत वाढ झाली आहे. यासह कोंबड्यांना दिल्या जाणार्‍या खाद्यासाठी लागणारा कच्च्या मालांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. औषधे महागली आहेत, वाहतूक खर्चही महागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या योजनेंतर्गत वाटप केल्या जाणार्‍या कोंबड्यांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी 25 तलंगा आणि 3 नर कोंबडे अशा तलंगाच्या एका गटाची किंमत 3 हजार रुपये होती. ती आता 4 हजार 200 रुपये करण्यात आली आहे. सुमारे साडेतीन किलो खाद्य प्रतिपक्षी याप्रमाणे आठ आठवड्यासाठींचा यापूर्वीचा खर्च 1400 रुपयेे होता. तो आता दुप्पट म्हणजेच 2 हजार 940 रुपये इतका करण्यात आला आहे. वाहतुकीचा खर्च 150 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत नेला आहे. औषधासाठी यापूर्वी 50 रुपये येणारा खर्च आता 700 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. रात्रीचा निवाराही 1 हजार रुपयांवरून 2 हजार रुपये करण्यात आला आहे तर खाद्यासाठी वापरण्यात येणार्‍या भांड्याचा खर्च 400 वरून 500 रुपये केला आहे. असा तलंगा गटासाठी यापूर्वीचा एकूण सहा हजार रुपये येणारा खर्च आता 10 हजार840 रुपये इतका केला आहे.

तलंगा गटासाठी कोंबड्या, औषधे, खाद्य आदी सर्व मिळून यापूर्वी लाभार्थ्याला स्वहिस्सा म्हणून तीन हजार रुपये मोजावे लागत होते. आता मात्र त्यासाठी 5 हजार 420 रुपये मोजावे लागणार आहेत. शंभर पिलांसाठी 8 हजार रुपये मोजावे लागत होते. त्याऐवजी आता 14 हजार 750 रुपये मोजावे लागणार आहेत.

एका दिवसाच्या पिलांच्याही किमतीत वाढ झाली आहे. 100 पिलांसाठी यापूर्वी 2 हजार रुपये असा दर होता. तो आता 2 हजार 500 इतका केला आहे. खाद्यासाठी एकूण 12 हजार 400 रुपये असणारा खर्च वाढवून आता 24 हजार रुपये केला आहे. वाहतुकीचा खर्च 100 वरून 500 वर, औषधांचा खर्च 150 वरून 1 हजारांपर्यंत वाढविण्यात आला आहे. रात्रीच्या निवार्‍याचा एक हजार रुपये हा दर मात्र कायम ठेवला आहे. खाद्याच्या भांड्याचा दर 350 रुपयांवरून 500 रुपये केला आहे. यामुळे शंभर पिलांसाठी यापूर्वी येणारा 16 हजार रुपयांचा खर्च आता 29 हजार 500 रुपयांवर गेला आहे.

Back to top button