कोल्हापूर : शिक्षकांच्या बदल्या आता पुढील शैक्षणिक वर्षातच | पुढारी

कोल्हापूर : शिक्षकांच्या बदल्या आता पुढील शैक्षणिक वर्षातच

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या सुरू असलेल्या बदली प्रक्रियेचा चौथ्या टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्याचे देखील काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत पहिल्या तीन संवर्गातील 433 शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन झाल्या आहेत. बदल्यांचे आदेश मात्र मुंबईतूनच काढण्यात येत असतात. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असल्यामुळे बदल्या झाल्या असल्या तरी आदेश मात्र मे महिन्यातच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय ठरायचा. बदल्यातील घोळामुळे आणि होणार्‍या गैरकारभारामुळे शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकारच काढून घेतले. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने बदल्यांचे आदेश आता मुंबईतूनच निघत असतात.

शिक्षकांच्या बदल्या करत असताना संवर्गनिहाय प्राधान्य क्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या सवंर्गामध्ये 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, अपंग, दुर्धर आजार, विधवा, परित्यक्ता, कुमारीका यांचा समावेश आहे. या संवर्गातील 368 शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यातील 290 शिक्षकांची बदली झाली आहे. संवर्ग दोनमध्ये पती, पत्नी यांची बदली केली जाते. यामध्ये पात्र असलेल्या सर्व शिक्षकांची बदली झाली आहे. संवर्ग तीनमध्ये दुर्गम क्षेत्रात 3 वर्षे काम केलेले शिक्षक बदलीस पात्र असतात. त्यातील 77 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. संवर्ग चारमध्ये एका शाळेत 5 वर्षे व एका तालुक्यात 10 वर्षे काम करणारे शिक्षक पात्र असतात. त्यामध्ये 749 शिक्षकांचा समावेश आहे. त्यातील 746 शिक्षकांनी ऑनलाईन माहिती भरली आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होईल. एक ते तीन संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांची सर्व ऑनलाईन माहिती भरण्यात आली आहे. असे असले तरी बदल्यांचे आदेश मुंबईतून निघत असतात. त्यामुळे बदलीच्या आदेशासाठी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे

Back to top button