कोल्हापूर : गोवा मार्गावरील प्रवास जीवघेणा! | पुढारी

कोल्हापूर : गोवा मार्गावरील प्रवास जीवघेणा!

गडहिंग्लज; प्रवीण आजगेकर :  अतिशय चांगला समुद्र किनारा लाभल्यामुळे गोव्याकडे पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणात वळली आहेत. पुणे विभागातून तर दररोज मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा या मार्गावर येत असल्याने या परिसराला दररोज जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. अशातच जर शनिवार, रविवारला जोडून एखादी सुट्टी आली तर मग मात्र या जत्रेचे रूपांतर महापुरातच होते अशी स्थिती आहे. पुण्यापासून गोव्याला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन तवंदी घाटालगत वळून उत्तूर, आजरा, सावंतवाडी मार्गाची ओळख आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर खड्ड्यांनी अक्षरशः विक्राळ रूप धारण केले आहे. या मार्गावर पर्यटकांचे कंबरडे मोडल्याशिवाय रहात नाही. सध्या संकेश्वर-बांदा या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांत येथील खड्डेच भरलेले नाहीत. अशातच आता रस्त्याचे काम सुरू असल्याने धुळीचे साम—ाज्य मोठ्या प्रमाणात असून डर्ट ट्रॅकवरचाच फिल येत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे, सांगली, सातारा, कराड, अहमदनगर, विदर्भासह कोल्हापूर परिसरातून गोव्याला जाणार्‍या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातून दररोज हजारो गाड्या गोव्याला जात असतात. तवंदी घाटापर्यंत येईपर्यंत या गाड्यांचा वेग हा 100 ते 120 च्या दरम्यान असतो. यामुळे साहजिकच पर्यटकांचा गोव्याला जाण्याचा जोश मोठ्या प्रमाणात असतो. भादवण फाट्यापर्यंत हा रस्ता सुसाटच असून, त्यानंतर मात्र अक्षरशः या रस्त्यावरचा वेग 30 ते 40 ला येतो.

या मार्गावर भादवण फाट्यापासून खड्ड्यांची सुरुवात झाली की मग थेट बांद्यापर्यंत दुरवस्थेतच जाण्याशिवाय पर्यटकांना पर्याय राहत नाही. केवळ काही किलोमीटरचा रस्ताच सुस्थितीत असून उर्वरित रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. नव्याने संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्याने या ठिकाणच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले असून, वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आंबोली मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तर फारच समस्या असून या परिसरातील खड्डे मोठ्या आकाराचे झाले आहेत. यामुळे या ठिकाणाहून वाहने जाताना केवळ डर्ट ट्रॅकचा अनुभव येऊ लागला आहे. नव्या संकेश्वर-बांदा मार्गासाठी वृक्षतोड झाली असून, सर्वच परिसर भकास दिसत आहे. यातच आता रस्त्याच्या कामामुळे खड्ड्यांची परिस्थिती मजैसे थेफ असून धुळही मोठ्या प्रमाणात असल्याने डर्ट ट्रॅकवरच गाडी चालवत असल्याचे वाहनधारकांना वाटत आहे.

गुगल मॅपवरील रस्ता बदलला…

यापूर्वी या रस्त्यावरून प्रवास करताना कोल्हापूर ते गोवा हा थेट उत्तूर-भादवण फाटा-आजरा-गवसे असा रस्ता गुगलवर दाखवला जात होता. मात्र या मार्गावर असलेले खड्डे तसेच रस्त्याच्या समस्येमुळे आता गुगलनेही शॉर्टकट काढला असून उत्तूर-वझरे-पेरणोली-गवसे असा नवा रस्ता दाखवत असून बहुतांशी पर्यटक या मार्गावरूनच प्रवास करत आहेत. मात्र हा रस्ता आडवळणी असल्याने अनेक पर्यटकांना रस्ता चुकल्यासारखेच वाटते.

संकेश्वर-बांदा मार्गामुळे बिकट समस्या…

संकेश्वर ते बांदा हा महामार्ग मंजूर झाला असून, प्रत्यक्षात त्याचे काम चालू झाले आहे. रस्ता मंजूर झाल्याने यावरील खड्डे भरले गेले नसून आता तर प्रत्यक्षात रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डे तर आहेतच सोबतील धूळही मोठ्या प्रमाणात असल्याने ही समस्या आणखी काही वर्षे राहणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रस्ता पूर्ततेकडेच वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button