संपतरावांनी सत्तेपेक्षा सामान्यांचे अश्रू पुसण्याला महत्त्व दिले : शरद पवार | पुढारी

संपतरावांनी सत्तेपेक्षा सामान्यांचे अश्रू पुसण्याला महत्त्व दिले : शरद पवार

कोल्हापर, पुढारी वृत्तसेवा : सहकारामध्ये काम करूनही चारित्र्यावर डाग पडू न देणार्‍या संपतराव पवार यांनी सत्तेपेक्षा नेहमी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक महत्त्व दिले. सामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. ज्यांच्यामुळे आपण आमदार झालो त्यांच्यासाठी आपणही काही तरी केले पाहिजे, ही त्यांची तळमळ आजही अस्वस्थ करणारी आहे. त्यांची ही अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी केले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार पवार यांच्या हस्ते सडोली खालसा (ता. करवीर) येथे करण्यात आला. या समारंभात शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील होते.

खा. पवार पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहूरायांचा समतेचा विचार पुढे नेण्याऐवजी जाती-धर्माच्या नावाखाली वेगळा विचार मांडून तो वाढविला जात आहे. माणसा माणसांमधील अंतर वाढवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. पुरोगामी म्हणून ओळखण्यात येणार्‍या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील हे चित्र दिसत आहे. या शक्तीला रोखण्याचे काम या पुढील काळात सर्वांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सेाडवणूक करण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेऊन संपतराव पवार यांनी आयुष्यभर काम केले. सामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी आपली शक्ती त्यांनी पणाला लावली. हद्दवाढ, पाणी प्रश्न तसेच नव्या शिक्षण धोरणाला आवर घालण्याच्या प्रश्नावर लढले. आमदार असताना दहा वर्षांत त्यांनी स्वत:चा विचार कधी केला नाही. अतिशय निर्मळपणे काम करत राहिले, असेही पवार म्हणाले.

प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्ध लढत जिल्ह्यात पुरोगामी विचार रुजविण्याचे काम संपतराव पवार यांनी केले, असे आ. हसन मुश्रीफ यांनी सांगितले. पुरोगामी विचारांचा आवाज म्हणून ओळखण्यात येणार्‍या संपतरावांनी शेतकर्‍यांना दिशा दाखविण्याचे काम केल्याचे खा. संजय मंडलिक यांनी सांगितले. आ. सतेज पाटील यांनी, पदाचा विचार न करता सामान्यांसाठी लढणारे संपतराव पवार-पाटील यांचे कार्यकर्ते आजही त्यांच्यासाठी स्वत:ची भाकरी बांधून पक्षकामासाठी तयार असतात, असे सांगितले. शिवाजी भुकेले यांचेही भाषण झाले.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पक्षनिष्ठा दुर्मीळ होत चालली आहे. आठ ते दहा वर्षांत चार पक्ष बदलणारे कार्यकर्ते आपण पाहतो. परंतु, संपतराव पवार यांनी लाल झेंडा कधी सोडला नाही. सत्ता त्यांनी कधीच महत्त्वाची मानली नाही.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले, पुरोगामी असणारे रात्रीत प्रतिगामी होत आहेत, अशी राजकारणाची सध्याची परिस्थिती झाली आहे. अशा वातवरणात संपतराव पवार यांनी प्रामाणिकपणे काम करत जनतेच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सत्कारास उत्तर देताना संपतराव पवार-पाटील म्हणाले, सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या ऋणांतून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. लोकांनी मला भरपूर दिले; परंतु मी मात्र त्यांना काही देऊ शकलो नाही, ही गोष्ट आजही मला अस्वस्थ करणारी आहे.

स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब देवकर यांनी केले. कार्यक्रमास आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, अरुण लाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संजयबाबा घाटगे, वैभव नायकवडी, संजीवनी पवार-पाटील, कर्नल भगतसिंह देशमुख, केरबा पाटील आदी उपस्थित होते. आभार एकनाथ पाटील यांनी मानले. मानपत्राचे वाचन दीपक तोरसकर यांनी केले.

Back to top button