इचलकरंजीला 130 हजार के.व्ही. वाढीव वीज मिळणार  | पुढारी

इचलकरंजीला 130 हजार के.व्ही. वाढीव वीज मिळणार 

इचलकरंजी, बाबासो राजमाने : इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासह अन्य उद्योगांना 130 हजार के.व्ही. इतकी जादा वीज उपलब्ध हेणार आहे. शहरासाठी नवीन 5 उपकेंद्रांसाठी मंजुरी व जुन्या उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यासाठीच्या पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्रस्तरावरून लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराच्या औद्योगिक विस्तारवाढीला संधी मिळणार आहे.

शहरासह कबनूर, चंदूर, कोरोची, तारदाळ, शहापूर, यड्राव आदी परिसरासह औद्योगिक वसाहतींमध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात उद्योग उभारण्यात येत आहेत. वाढलेली लोकसंख्या, त्याचबरोबर वाढत असलेला औद्योगिक विस्तार, यामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर ताण वाढला आहे. घरगुती, शेतीसाठी वीज जोडणी मिळत असली, तरी मोठ्या 800 अश्वशक्तीहून अधिक वीज लागणार्‍या उद्योगांना मात्र वीजपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.

इचलकरंजी विभागात तब्बल 16 उपकेंद्रे आहेत. 20 हजार के.व्ही. इतक्या क्षमतेच्या उपकेंद्रांमधून सध्या वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, वाढत असलेली विजेची मागणी आणि भविष्यातील लागणार्‍या विजेच्या विस्ताराचा आढावा घेऊन महावितरणने केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत वाढीव 5 उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. तिळवणी, इचलकरंजी नाईक मळा, निरामय हॉस्पिटल परिसर, शहापूर आणि तारदाळ या पाच नव्या उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे.

सध्या शहापूर येथे 40 हजार के.व्ही., तर तारदाळ येथे 20 हजार के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र असून, या ठिकाणी तातडीने नवीन दोन उपकेंद्रे उभारणे गरजेचे आहे. 2012 पासून इचलकरंजी उपविभागामध्ये सातत्याने विजेची मागणी वाढत असल्याने ‘आरएपीडीआरपी’, इन्फ्रा, ‘आयपीडीएफ’ या विविध योजनांतर्गत वाढीव वीज क्षमता उपलब्ध झाली आहे. केंद्रस्तरावर अंतिम मंजुरीसाठी असलेल्या नवीन पाच उपकेंद्रांची उभारणी व चार उपकेंद्रांच्या क्षमतावाढीला मंजुरी मिळाल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

Back to top button