कोल्हापूर : व्हिडीओ पार्लरमधील नोकरी घालवल्याने ऋषिकेशला संपवले | पुढारी

कोल्हापूर : व्हिडीओ पार्लरमधील नोकरी घालवल्याने ऋषिकेशला संपवले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दगडाने ठेचून खून करण्यात आलेला ऋषिकेश सूर्यवंशी आणि अथर्व हावळ एकाच व्हिडीओ पार्लरमध्ये काम करत होते. व्हिडीओ पार्लरमधील हिशोबातील फेरफार केल्याचा आरोप संशयित अथर्व हावळवर घालण्यात आला. यातच अर्थवला कामावरून काढण्यात आले. ऋषिकेशच्या सांगण्यारून हा प्रकार झाल्याचा समज झाल्याने अथर्वने मित्रांच्या मदतीने कट रचून ऋषिकेश सूर्यवंशी याला संपवले. पोलिस तपासात हा प्रकार समोर आला असून, चारही संशयितांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.

गणेश लिंगाप्पा यलगट्टी (वय 20, रा. गिरगाव रोड, पाचगाव, ता. करवीर), अथर्व संजय हावळ (20, कुंभार गल्ली, शाहू उद्यान), वृषभ विजय साळोखे (21, रामानंदनगर), सोहम संजय शेळके (20, गजानन महाराजनगर, मंगळवार पेठ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. पाचगाव रोडवर जगताप नगरातील निर्जन माळावर ऋषिकेश उर्फ संभा महादेव सूर्यवंशी याचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता.

संशयित आरोपी अथर्व हावळ आणि ऋषिकेश हे गंगावेश परिसरातील एका व्हिडीओ पार्लरमध्ये काम करत होते. याठिकाणी हिशोबात अनेकवेळा रकमेत फरक पडत होता. ही रक्कम अथर्व हा घेत असल्याचे अनेकदा ऋषिकेशने मालकाला सांगितले होते. या कारणातून अथर्वला कामावरून काढून टाकण्यात आले. यानंतर त्याच्यात आणि ऋषिकेशमध्ये खुन्नस निर्माण झाली होती.

गंगावेशमधून मृताची दुचाकी जप्त

अथर्वने ही बाब त्याचा मित्र गणेश यलगट्टी याला सांगितली. गणेश यलगट्टी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांनी ऋषिकेशला संपवण्याचा कट रचला. त्याला दारू पिण्याच्या आमिषाने गंगावेश येथे बोलावले. गंगावेश चौकात ऋषिकेशची दुचाकी उभी करून त्याला स्वत:च्या दुचाकीवरून जगतापनगर येथे नेले. त्याठिकाणी चौघांनी मिळून त्याचा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी शनिवारी गंगावेश येथून मृत ऋषिकेशची दुचाकी जप्त केली. संशयितांकडे पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

Back to top button