२०२४ ला बारामतीची जागा भाजपच जिंकेल : गोपीचंद पडळकर | पुढारी

२०२४ ला बारामतीची जागा भाजपच जिंकेल : गोपीचंद पडळकर

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र बदलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. २०१९ च्या निवडणूकीत बारामतीची जागा थोडक्या मतांमध्ये गेली. पण २०२४ मध्ये ही जागा भाजप जिंकणारच, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. कोल्हापूर येथे आज (दि.१९) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पडळकर म्हणाले की, “२०१४ पासून हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत. या विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा विकास सुरू असून देश बदलत असल्याचे ते म्हणाले.

मंत्री शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्या भेटीबाबत बोलताना म्हणाले की, पार्थ पवारांच्या मनातील खंत समजू शकतो. पण ते कशासाठी भेटले हे माहीत नाही. एकीकडे पार्थ पवार अडीच लाखांहून अधिक मताने त्यांच्याच जिल्ह्यात पराभूत झाले. दुसरीकडे मात्र त्यांचे बंधू आमदार होतात. आता तर ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. बारामती ॲग्रो त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे पार्थ पवारांची खंत असू शकते, असे पडळकर यांनी म्हटले आहे.

Back to top button