कोल्हापूर : पंचगंगा घाट सुशोभीकरणाचा चेंडू ‘पुरातत्त्व’ कडे | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा घाट सुशोभीकरणाचा चेंडू 'पुरातत्त्व' कडे

कोल्हापूर; सुनील सकटे :  पंचगंगा घाट सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे चार कोटी रुपये खर्चातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पायऱ्यासह नदीतील मंदिरांची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठी परवानगीचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविला आहे. त्यामुळे पंचगंगा सुशोभीकरणाचा चेंडू आता पुरातत्त्व विभागाकडे आहे.

चार जानेवारी २०१७ रोजी पंचगंगा घाट सुशोभीकरणास चार कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर होता. जमीन सुधारणा व सपाटीकरण, संरक्षक भिंत, सुरक्षा कठडे, नवीन घाट बांधणे, जुन्या घाटाचे नूतनीकरण करणे, बागबगीचा करणे, दगडी दीपमाळ तयार करणे आदी कामांचा समावेश होता. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या आदेशाने हे काम बंद पडले आहे. पुन्हा घाट सुशोभीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या योजनेत दोन टप्यात घाटाचे सुशाभीकरण केले जाणार आहे. चार कोटींचा जुना प्रस्ताव मागे टप्प्यात ठेवण्यात आला आहे. आता पहिल्या जाणार टप्प्यात घाटावरील घाट ते पिकनिक पॉईंट येथपर्यंतच्या सर्व पायऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच गायकवाड पुतळा ते पिकनिक पॉईटपर्यंत भिंत बांधण्यात येणार आहे. याबरोबरच पंचगंगा नदीतील दीपमाळा, मंदीरे यांची दुरुस्ती केली जाणार आहे. पायऱ्यांची दुरुस्ती करून त्यावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

पंचगंगा घाटाचा समावेश वारसास्थळांमध्ये होतो. यापूर्वी घाट सुशोभीकरणाचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या आदेशामुळे बंद पडले आहे. त्यामुळे घाट दुरुस्तीसाठी अथवा सुशोभीकरणासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरातत्त्व विभागाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन समितीतून ३ कोटी ८० लाख रुपयांतून महापालिकेतर्फे हे काम करण्याचे नियोजन आहे. पुरातत्त्व विभागाकडून हिरवा कंदील मिळताच कामास गती मिळणार आहे.

Back to top button