काळम्मावाडी धरण : काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती वाढली | पुढारी

काळम्मावाडी धरण : काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती वाढली

पुढारी वृत्तसेवा : तुरंबे

काळम्मावाडी धरण  काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती वाढली आहे. याचबरोबर धरणाची गॅलरी आणि इतर ठिकाणातून गळतीचे प्रमाण वाढत आहे. सध्या मुख्य भिंतीतून प्रती सेकंद १९० लिटर पाण्याची गळती होत असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात ही गळती अधिक आहे.

मेघोलीसारीखी दुर्घटना घडल्यावर यांचे डोळे उघडणार का ? तर काळम्मावाडी धरण सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने तात्काळ ही गळती थांबवण्यासाठी उपाय योजना राबवावी अशी मागणी शेतकरी वर्ग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळम्मावाडी धरणाची धरणाची ओळख आहे. मात्र आता गळतीच धरण म्हणून ओळखल जातय. येथील दूधगंगा जलाशयाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीबरोबर धरणाची गॅलरी, सांधे यासह धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मोनोलीत १ ते ९ मध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे.

धरणाच्या मुख्य भिंतीचे काम कमकुवत

सध्या या धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटर गळती होत असल्याचे तज्ञांचे मत असले तरी मुख्य भिंतीतून येणारे पाण्याचे कारंजे बघितले तर गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. धरण बांधणीपासून धरणाच्या मुख्य भिंतीचे काम कमकुवत झाल्याचे या गळतीतून दिसून येते.

सध्या धरण शंभर टक्के भरले आहे यामुळे गळतीचे प्रमाण वाढले आहे ही बाब गंभीर आहे यापूर्वी याच धरणाच्या भिंतीची गळती काढण्यासाठी धरणावरून होल मारून सिमेंट ग्राउटिंग, इफोक्सिंग ग्राउटिंग केल आहे. यासाठी कोठ्यावढी रुपये खर्च केले आहेत. मात्र धरणाची आताची गळती बघितली तर गळती काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी सांगितले.

तर मेघोलीची पुनरावृत्ती होईल

तर मेघोली धरण फुटून झालेली दुर्घटना गंभीर आहे या घटनेमुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून काळमावाडी धरण फुटल्यावरच शासन जाग होणार का असा सवाल त्यांनी केला. जिल्ह्यातील मंत्री धरणातून कोल्हापूरला पिण्याचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र धरणाच्या गळतीकडे लक्ष नसल्याचा आरोपही पोवार यांनी केला. यामुळे दिव्याखाली अंधार असेच म्हणावे लागेल.

विश्वसनीय सूत्राकडून धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटरची गळती असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात ही गळती मोठ्या प्रमानात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. २००९ साली धरणातून सुमारे प्रती सेकंद पाचशे लिटर पाण्याची गळती होती त्यानंतर गळती काढण्यासाठी उपाययोजना राबवली मात्र त्याला फारस यश आल नाही यामुळे या धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर आहे.

प्रती वर्षी पाण्याचं दाबाने गळतीचे प्रमाण वाढते ते थांबवण्यासाठी वेळीच नवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असते याचबरोबर धरणाचा शास्त्रज्ञानच्या कडून अभ्यास करणेही गरजेचे असते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याचं पाण्यासाठी या जलाशयातील पाण्याचा वापर होतो. मात्र धरणाला लागलेली गळतीवर लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अजित पोवार, युवा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Back to top button