कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते डिसेंबरअखेर कोल्हापूर विभागाच्या जीएसटी महसुलात दहा टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक एक हजार 241 कोटी 56 लाखांचा महसूल जमा झाला आहे.
देशात 2017 पासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात आली. 'वन नेशन वन टॅक्स' ही संकल्पना राबवली जाणार असल्याने त्याचे स्वागत झाले. पण टप्याटप्याने जीएसटी कौन्सिलकडून जीएसटी करवसुलीच्या मर्यादा वाढवल्या गेल्या. ग्राहकांच्या खिशावर अप्रत्यक्षपणे कराचा बोजा वाढत गेला. यामुळेच जीएसटी वसुलीत सतत वाढ होत आहे. व्हॅट लागू असतानाही कर वसुलीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर होता. आता जीएसटीमध्येही कोल्हापूरचा कराचा आलेख वाढत चालला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर विभागाचा महसूल दोन हजार 344 कोटी 84 लाख रुपये होता. यावर्षी तो दोन हजार 575 कोटी रुपयांवर गेला आहे. गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याचा महसूल एक हजार 114 कोटी 87 लाख रुपये होता. यावर्षी तो एक हजार 241 कोटी 87 लाख रुपयांवर गेला आहे. सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून तो या डिसेंबरअखेर 50 कोटी 58 लाख इतका आहे. मार्चअखेर यात आणखी वाढ झाल्यास एकूण जीएसटी महसुलात 12 ते 13 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर 1 हजार 114 कोटी 87 लाख 1 हजार 241 कोटी 56 लाख
सांगली 449 कोटी 4 लाख 492 कोटी 50 लाख
सातारा 431 कोटी 60 लाख 445 कोटी 08 लाख
ओरस 39 कोटी 70 लाख 50 कोटी 58 लाख
रत्नागिरी 309 कोटी 62 लाख 345 कोटी 77 लाख
एकूण 2 हजार 344 कोटी 84 लाख 2 हजार 575 कोटी 50 लाख