बेळगाव : सीमाप्रश्नी आता ‘चलो मुंबई’ ; समितीची हाक | पुढारी

बेळगाव : सीमाप्रश्नी आता ‘चलो मुंबई’ ; समितीची हाक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने आक्रमक होण्याची गरज आहे. पण महाराष्ट्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.

मराठा मंदिर सभागृहात शुक्रवारी मध्यवर्ती समितीची बैठक कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी गांभीर्याने अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. किणेकर म्हणाले, सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय करत आहे. या विरोधात महाराष्ट्र सरकारने आक्रमक होणे अपेक्षित आहे. पण महाराष्ट्रातील राज्यकर्ते आमच्याकडे दुर्लक्ष करत असून सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन कामकाजाबाबलाही म्हणावी तशी गती येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, यशवंत बिर्जे, बी. डी. मोहनगेकर आदींनी मनोगत व्यक्त करून चलो मुंबई आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

17 जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना बेळगाव हुतात्मा चौक आणि कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा चौकात अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत घटक समित्याने बैठका घेऊन निर्णय घ्यावा, असेही सूचित करण्यात आले. 17 जानेवारी रोजी संध्याकाळी मराठा मंदिर येथे जाहीर सभा आयोजित करण्यावरही निर्णय झाला.

यावेळी अ‍ॅड. एम. जी. पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, एस. एल. चौगुले, बी. एस. पाटील, रावजी पाटील, विकास कलघटगी, नानू पाटील, निपाणी समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, सुरेश राजूकर आदी उपस्थित होते.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना भेटणार समिती शिष्टमंडळ

महाराष्ट्र – कर्नाटक सीमालढ्यात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान आहे. या प्रश्नावर त्यांनी कोल्हापूर येथे सीमा परिषद आयोजित करणार असल्याचे सांगितले असून त्यासाठी लवकरच शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सीमावासीयांना नेहमीच साथ दिली आहे. कोल्हापूर येथे आयोजित आंदोलनाबाबत त्यांची भेट घेतली असता त्यांनी, लवकरच कोल्हापुरात सीमा परिषद आयोजित करू. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व आमदार, खासदारांना एकत्र करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार लवकरच समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. सीमा परिषदेतून महाराष्ट्राला जाग आणण्यात येईल.

Back to top button