कोल्हापूर : ‘प्रयोग’ बनले कोल्हापूरकरांचे हक्काचे व्यासपीठ | पुढारी

कोल्हापूर : ‘प्रयोग’ बनले कोल्हापूरकरांचे हक्काचे व्यासपीठ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा :  गौरवशाली 84 वर्षांची परंपरा लाभलेला दै. ‘पुढारी’ सर्वसामान्यांच्या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीत नेहमीच अग्रेसर असतो. दै. ‘पुढारी’ संचलित ‘प्रयोग सोशल फाऊंडेशन’ हा याच सामाजिक कार्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून समाजाप्रती बांधिलकी जपत हे फाऊंडेशन कोल्हापूरकरांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ‘प्रयोग’तर्फे समाजातील विविध घटकांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा लाभ हजारो विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांना झाला आहे.

सन 2022 वर्षभरातील उपक्रम :

शालेय व महाविद्यालयीन उपक्रम : कोल्हापूर मनपाच्या 58 शाळांमध्ये ई-लर्निंगचा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानासोबत सायबर विश्वाबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. याशिवाय राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांसाठी जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानानिमित्त कोल्हापूर सांगली, सातारा येथे एनएसएस विभागाच्या सहकार्यातून सामूहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात आले.

पर्यटन : ‘हेरिटेज कोल्हापूर’ या उपक्रमांतर्गत पर्यटन विकासासाठी मार्गदर्शनपर सत्र माहितीपर चित्रफितींसह घेण्यात आले. वारसा सप्ताह अंतर्गत ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयांना 2500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भेटी देत ही अनोखी दुनिया अनुभवली.
आरोग्य शिबिरे ः गुडघे, कंबरदुखीवर नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. मुलांना प्रथमोपचाराचे मार्गदर्शन केले. कान, नाक, घसा यावर मार्गदर्शनपर सत्र यू-ट्यूबवरून प्रसारित करण्यात आले. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी आयक्यू टेस्ट गोमटेश स्कूल, निपाणी येथे घेण्यात आली.

प्रदूषण व पर्यावरण : पंचगंगा घाट परिसरात प्रदूषण पातळी मापन कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण संवर्धनात सीड बॉल प्रात्यक्षिक, पक्षी वाचवा उपक्रम घेण्यात आले. पर्यावरणपूरक उत्सवासाठी पथनाट्यातून आवाहन करण्यात आले.

वंचितांसाठी विशेष उपक्रम :  एचआयव्ही बाधितांचा विवाह परिचय मेळावा घेत 26 जणांच्या लग्नगाठी बांधल्या गेल्या. तसेच ‘एक पणती माणुसकीची’ या उपक्रमातून दिवाळीनिमित्त एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना साहित्य, फराळ वाटपाचा उपक्रम राबवला. नॅबच्या मदतीने अंध बांधवासाठी गायन वादन स्पर्धा घेण्यात आली.

सामाजिक उपक्रम : ‘बीएच 6’ या नवतंत्रज्ञानावर आधारित टू व्हिलर मेकॅनिक कार्यशाळा घेण्यात आली. पुढारी रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने सीपीआर रुग्णालयास अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. कोल्हापूरसह पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई येथील वाहतूक नियंत्रण शाखेस बॅरिकेडस देण्यात आली.

Back to top button