सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शरद पवार  | पुढारी

सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शरद पवार 

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीत कोणत्याही प्रकारे कमतरता राहू नये, याबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात येतील. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ वकिलांना संपर्क साधण्यात येईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कोल्हापूर दौर्‍यावर असलेल्या पवार यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी सकाळी भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्नाच्या 11 जानेवारी रोजी होणार्‍या सुनावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणी होणार आहे, ही जमेची बाब असली तरी महाराष्ट्र सरकारने कोणत्याही बाबतीत गाफील राहू नये, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. कर्नाटकाचा अंतरिम अर्ज निकालात काढण्यात यावा आणि नियमित सुनावणीला प्रारंभ व्हावा, यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती पवार यांनी शिष्टमंडळाला दिली.

महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री आणि आमदार सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी अनावश्यक मागणी करत आहेत. त्यामुळे याबाबतही सूचना करण्यात यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

शिष्टमंडळात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. एम. जी. पाटील, सुनील आनंदाचे आदींचा सहभाग होता.

अजित पवारांकडूनही ग्वाही

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज चंदगड आणि गडहिंग्लज दौर्‍यावर होते. गडहिंग्लज येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सीमाप्रश्नावर 11 जानेवारी रोजी होणार्‍या सुनावणी बाबत चर्चा केली. यावेळी मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

Back to top button