आगामी निवडणुका ‘मविआ’ एकत्र लढणार : शरद पवार | पुढारी

आगामी निवडणुका ‘मविआ’ एकत्र लढणार : शरद पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आहे. आगामी निवडणुकीतही आम्ही एकत्र राहूच; पण त्याचबरोबर अन्य राजकीय पक्ष, संघटना यांच्याशी चर्चा करून त्यांनाही सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

निवडणुका जवळ आल्यामुळे जनतेचे मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याकरिता आता राममंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असल्याचा
आरोपही त्यांनी केला.

सत्तेत आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवून वागायचे असते. परंतु सत्तेतील नेतेच बेताल वक्तव्य आणि विरोधकांना तुरुंगात घालण्याची भाषा करत असतील तर ते योग्य नाही. राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप होतच असतात. परंतु आरोप करताना देखील मर्यादा पाळल्या पाहिजेत. भाषेचा वापर जपून केला पाहजे. सध्या सत्तेत असलेल्या सरकारला लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दिलेला शब्द ते पाळू शकलेले नाहीत. त्याबद्दल जनताच आता त्यांना विचारू लागली आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच राम मंदिराची चर्चा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली आहे, असे पवार म्हणाले.

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता ठाकरेंसोबतच

राज्यातील शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही. जनतेच्या मनातील भावना येत्या निवडणुकीत लक्षात येतील, असेही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भाजपला भारत जोडो यात्रेने उत्तर

राहुल गांधी यांची टिंगल-टवाळी करण्याचा कार्यक्रम सत्ताधार्‍यांनी सुरुवातीपासूनच हाती घेतला आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानेही त्यांनी टीका-टिप्पणी केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करत राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेत अन्य पक्षांना तसेच गांधींजींच्या विचाराच्या संघटनांनाही सहभागी करून घेत असल्याने प्रतिसाद वाढत आहे. सामान्य माणसांचीही सहानुभूती भारत जोडो यात्रेस मिळत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे, असा आरोप पवार यांनी केला.

राज्यपालपद हे महत्त्वाचे पद आहे. पण सध्या त्याची प्रतिष्ठा राखली जात नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाची जबाबदारी राज्यपालांनी पार पाडली पाहिजे. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उलट चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. हे योग्य नसल्याचे पवार यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्तीच्या टीकेची आपण दखल घेत नाही. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमची गेल्या काही वर्षांतील मागणी आहे. छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक म्हणणे चुकीचे नाही. त्यामुळे वाद होण्याचे काही कारण नाही, असेही पवार म्हणाले.

Back to top button