कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 25 हजार मतदार घटले | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 25 हजार मतदार घटले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 हजार मतदार कमी झाले आहेत. दि. 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्याची मतदार संख्या 31 लाख 50 हजार 46 इतकी झाली. मृत मतदारांसह दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे कमी झाल्याने यावर्षी मतदार संख्येत घट झाली.

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. त्यानुसार मतदार संख्या 31 लाख 50 हजार 46 इतकी झाली. यामध्ये 16 लाख 12 हजार 957 पुरुष तर 15 लाख 36 हजार 966 महिला व 123 इतर मतदारांचा समावेश आहे. गतवर्षी जिल्ह्याची मतदार संख्या 31 लाख 75 हजार 205 इतकी होती.

कोरोना काळात 45 वर्षांवरील नागरिकांचा ‘आयुष’ सर्व्हे झाला होता. मतदार यादीचा वापर करून झालेल्या या सर्व्हेत तब्बल 97 हजार मतदार मृत झाल्याचे समोर आले होते. या मतदारांच्या मृत्यूचे दाखले ग्रामसेवकांकडून घेऊन त्यांची नावे रद्द करण्याचे काम प्रशासनाने केले होते. यामुळे नवीन मतदारांची नोंद होऊनही जिल्ह्याच्या एकूण मतदार संख्येत यावर्षी घट झाली.

Back to top button