कोल्हापूर : पन्हाळ्याला गतवैभव मिळणार | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळ्याला गतवैभव मिळणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पन्हाळ्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून त्यांना गतवैभव मिळवून दिले जाणार आहे. नायकिणीचा सज्जा, बुरूज यासह पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. त्याचा सविस्तर आराखडा राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग तयार करणार असून, त्याचे लवकरात लवकर सादरीकरण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री बोलत होते. पन्हाळ्याला गतवैभव मिळवून देण्याबाबत आ. विनय कोरे यांनी दिलेल्या पत्रानुसार ही बैठक बोलावण्यात
आली होती. पन्हाळ्यावर जे बुरूज तसेच नायकिणीच्या सज्जासह ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली आहे; त्यांची पुन्हा उभारणी करावी, अशी मागणी कोरे यांनी या बैठकीत केली.

शिवप्रेमींची मागणी : आ. कोरे

पन्हाळ्याला गतवैभव मिळवून देण्याची शिवप्रेमींची अनेक वर्षार्ंपासूनची मागणी आहे. त्याद़ृष्टीने या कामाला लवकर सुरुवात होईल, असे आ. विनय कोरे यांनी सांगितले.

केंद्र व राज्याच्या निधीतून विकास

पन्हाळा किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले. यासाठी येणारा खर्च हा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांकडून करण्यात यावा, यासाठी एक सामंजस्य करार करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Back to top button