कोल्हापूर : टेंबलाईवाडी टेकडीनजीक अपघात; दुचाकीस्वाराला डंपरने फरफटत नेले | पुढारी

कोल्हापूर : टेंबलाईवाडी टेकडीनजीक अपघात; दुचाकीस्वाराला डंपरने फरफटत नेले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला धडक देत 50 फुटांपर्यंत फरफटत नेले. इंद्रजित नंदकुमार वेल्हाळ (वय 32, रा. संकपाळ अपार्टमेंट, उचगाव) असे जखमीचे नाव आहे. डंपरखाली सापडून दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून जखमीचे दोन्ही पाय, कंबर, डोक्याला गंभीर इजा झाली आहे. अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे.

इंद्रजित वेल्हाळ हे टेंबलाई उड्डाणपुलाजवळील मॉलमध्ये पर्चेस मॅनेजर आहेत. दुपारी एकच्या सुमारास ते उचगावकडे कामानिेमित्त निघाले होते. याचवेळी उचगावकडून आलेल्या भरधाव डंपरने टेंबलाई मंदिर कमानीसमोरील बस थांब्याजवळ वेल्हाळ यांना धडक दिली. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने सुमारे 50 फुटांपर्यंत फरफटत नेल्यानंतर डंपर एका झाडाला धडकून थांबला. या धडकेत दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून वेल्हाळ यांच्या दोन्ही पायांना, डोक्याला, कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.

रुग्णवाहिकेतून वेल्हाळ यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालायात हलविण्यात आले. डंपर चालक दिनेश महंत याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Back to top button