कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आणखी 320 कोटींची गरज | पुढारी

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आणखी 320 कोटींची गरज

उजळाईवाडी, दौलत कांबळे : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणखी 320 कोटींची गरज असून याचा प्रस्ताव कोल्हापूर विमानतळाकडून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे .

विमानतळ विस्तारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. खा. धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून त्यासाठी 338 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून टर्मिनल बिल्डिंग, रन वे, एटीसी टॉवर अ‍ॅप्रन बे, कंपाऊंड यासाठी हा निधी प्राप्त झाला होता. त्यातील काही कामे सुरू असून काही पूर्णत्वास आली आहेत.

नाईट लँडिंगमुळे कोल्हापूर विमानतळ जगाच्या नकाशावर आले आहे. सध्या 1890 मीटरचा रन वे तयार झाला असून 2300 मीटर रन वेसाठी आणखी 64 एकर जागेची गरज आहे. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून 64 एकर जागा शेतकर्‍यांकडून घेण्यासाठी राज्य शासनाकडून 212 कोटींचा निधी प्राप्त केला आहे. ही 64 एकर जागा लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात येणार असल्याने त्याच्या विस्तारीकरणासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आणखी 320 कोटी निधी कोल्हापूर विमानतळासाठी देणे आवश्यक आहे.

यातील पाचशे मीटर रन वे वाढवण्यासाठी 64 एकर जागेतील 32 एकर जागा गरजेची असून ही जागा खोल असल्याने मुरूम भरून लेव्हल करणे गरजेचे आहे. यासाठी कोल्हापूर विमानतळाकडून 320 कोटींचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी खा. महाडिक, खासदार
संजय मंडलिक, खासदार धर्यशील माने प्रयत्न करत आहेत.

Back to top button