समृद्धीची भाग्यरेषा आज महाराष्ट्र चरणी अर्पण! | पुढारी

समृद्धीची भाग्यरेषा आज महाराष्ट्र चरणी अर्पण!

कोल्हापूर; पुढारी डेस्क : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 710 किलोमीटर लांबीच्या या महामार्गातील नागपूर-शिर्डी हा टप्पा 570 किलोमीटरचा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव या महामार्गाला देण्यात आले आहे. महामार्गाचा हा पहिला टप्पा खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. प्रवासाचा तब्बल निम्मा वेळ या टप्प्यामुळे वाचणार आहे. हा एक्स्प्रेस वे भारतातील पहिला हायस्पीड हायवे आहे, हे येथे महत्त्वाचे!

समृध्दी

    फडणवीसांना अशी सुचली कल्पना

विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागांच्या विकासाशिवाय समग्र विकसित महाराष्ट्राची संकल्पना यशस्वी होऊ शकत नाही, हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणले. काय करावे, या विचारात असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला थेट जोडण्याची कल्पना त्यांना सुचली. हीच समृद्धी महामार्गाची सुरुवात होती. उद्धव ठाकरेंसह अन्य नेत्यांनी या संकल्पनेला सुरुवातीला विरोध केला होता. काहींनी महामार्गाविरोधात शेतकर्‍यांची आंदोलनेही घडवून आणली. ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे’ असे या प्रकल्पाचे नाव होते, त्याचे नामकरण पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे करण्यात आले.

कुणाला थेट फायदा?
10 जिल्हे / 26 तालुके / 392 गावे

    गर्जा महाराष्ट्र माझा…

प्रत्यक्षात, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या 10 जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. 26 तालुके महामार्गाद्वारे परस्परांना जोडण्यात येत असून, एकूण 392 गावांतून महामार्ग जाईल. महामार्गामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्हे एकमेकांना जोडले जातील. राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी पाच विभागांतून थेट जाणार आहे, हे महत्त्वाचे.

महामार्गावर असतील ऐसी ही तीर्थक्षेत्रे, कृषी समृद्धी केंद्रे, रहिवासी स्थळे, हरित क्षेत्रे

  • 10 जिल्ह्यांमध्ये मिळून 20 पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित आहेत. या मार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहेत. अशा दोन केंद्रांमधले सरासरी अंतर 30 कि.मी. असेल.
  • प्रत्येक केंद्राचे आकारमान साधारणत: 1,000 ते 1,200 एकर, 400 ते 500 हेक्टर इतके असणार आहे. या केंद्रांमध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल.
  • याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसह रहिवासी क्षेत्रही असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, 15 टक्के भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर 20 टक्के भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच 10 टक्के भाग हरित क्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल आणि
    5 टक्के भाग हा सार्वजनिक वापरासाठी असेल.

        महामार्गाची वैशिष्ट्ये

  • हा ग्रीनफिल्ड महामार्ग असून, मार्गाच्या दुतर्फा साडेआठ लाख झाडे असतील
  • या मार्गाची रुंदी 120 मीटर एवढी प्रशस्त आहे
  • महामार्ग इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमशी (आयटीएमएस) जोडलेला आहे. त्यामुळे वेगमर्यादा पाळावी लागेल. लेन तोडणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात लगेच कारवाई होणार आहे
  • प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनाशुल्क दूरध्वनी सेवेची सुविधा मिळणार आहे
  • महामार्गाच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्यात येणार आहे
  • नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहनचालकास 900 रु. टोल द्यावा लागेल

Back to top button