कोल्हापूर : पडसाळीच्या थेट सरपंच पदी कविता शेळके बिनविरोध! | पुढारी

कोल्हापूर : पडसाळीच्या थेट सरपंच पदी कविता शेळके बिनविरोध!

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यात 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून थेट सरपंच पदासाठी प्रत्येक गावात इर्षेने एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील पडसाळी या दुर्गम गावाने मात्र ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन कविता बाळू शेळके यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल केल्याने शेळके या पहिल्या थेट बिनविरोध महिला सरपंच ठरल्या आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या उर्वरित सात जागाही ग्रामस्थांनी बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असून अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी डमी अर्ज माघार घेतल्यानंतर सात बिनविरोध उमेदवारांची अधिकृत निवड प्रशासनाकडून जाहीर होईल. दाजीपूर अभयारण्याच्या पूर्व दिशेला अभयारण्य सीमेलगत असलेले पडसाळी हे गाव काही धनगरवाडे आणि छोट्या वाड्यामध्ये विखुरलेले आहे .

गावातील दोन परस्परविरोधी आघाड्यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही आघाड्यांना अडीच – अडीच वर्षे सरपंच पद विभागून देण्याचा निर्णय झाला असून पहिल्या टर्ममध्ये सरपंच पद घेणाऱ्या आघाडीला सदस्य पदाच्या तीन जागा तर दुसऱ्या आघाडीला उपसरपंच पद आणि चार जागा असे धोरण ठरविण्यात आले आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच आप्पाजी पाटील, तानाजी पाटील, आनंदा पाटील, कृष्णा पाटील, सावबा कांबळे, गणपतराव पाटील आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

Back to top button