कोल्हापूर : पॅनेल रचनेतही राजकारण | पुढारी

कोल्हापूर : पॅनेल रचनेतही राजकारण

कोल्हापूर, डॅनियल काळे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची एकेक प्रक्रिया पार पडेल तसे या निवडणुकीत रंग भरत चालला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी आणि माघारीसाठी आता वेळ आहे. याच काळात आता पॅनेल आकाराला येणार आहे. गावातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले असून पॅनेल रचनेतच प्रतिस्पर्ध्याचा पत्ता कट करण्याची रणनीती आखली जात आहे. सरपंच निवडणुकीत तर कमालीची ईर्ष्या आहे. डझनावर उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने चुरस वाढली असून आपल्यालाच हे पद मिळावे, यासाठी उमेदवारी मिळण्यापासूनच तयारी केला जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रंगत वाढली आहे. एकूणच लढत कशी होईल, याचा अंदाज येत आहे. आपला प्रतिस्पर्धी कोण? याची नावे समोर येत आहेत. त्यामुळे वरचढ ठरणार्‍या प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या कमकुवत बाजू सांगून निवडणुकीतून त्याचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकाच्या कमकुवत बाजूच मतदारसंघात पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलला महत्त्व आहे. प्रतिस्पर्ध्याला या पॅनेलमध्येच स्थान मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याच्यापेक्षा आपलीच उमेदवारी कशी श्रेष्ठ हे सांगण्यासाठी आटापिटा सुुरू आहे. चौकाचौकात त्याचीच चर्चा सुरू असून वातावरण निवडणूकमय बनले आहे.

आर्थिक ताकदीला आव्हान देण्याचा प्रयत्न

या निवडणुकीतही पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नेत्यांकडून अथवा गावातील कारभार्‍यांकडूनच असे आर्थिक ताकद असलेले उमेदवार शोधून त्यांना पॅनेलमध्ये घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे; परतु आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही निवडणूक लढवायची नाही का? असे म्हणत काही सामान्य कार्यकर्ते हे पैसेवाल्यांनाही आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.‘शड्डू ठोकलाय? आता काय व्हायचे ते होऊ दे’ म्हणत असे कार्यकर्तेही ताकदीने कामाला लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या ऐन थंडीतही ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Back to top button