कोल्हापूर : विद्यार्थ्यांनो, नियमांचे पालन करून खुशाल जा सहलीला! | पुढारी

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनो, नियमांचे पालन करून खुशाल जा सहलीला!

कोल्हापूर, प्रवीण मस्के : कोरोनानंतर दोन वर्षांनी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचे वेध लागले आहेत. शिक्षण विभागाने सहलीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पालकांचे संमतीपत्र, शिक्षण विभागाची परवानगी या अटी पूर्ण करूनच विद्यार्थ्यांना सहलीस नेता येणार आहे.

कोरोना काळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना बाहेरील जग पाहता आले नाही. यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाले आहे. सध्या दिवाळी सुट्टी संपून शाळांच्या दुसर्‍या सत्रास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी याकाळात शाळांच्या शैक्षणिक सहलीचा हंगाम असतो. विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळावी म्हणून पर्यटनस्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती व्हावी, हा शैक्षणिक सहली आयोजनामागचा उद्देश असतो.

दोन वर्षे कोरोना व एसटीच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचे वेध लागले आहेत. शाळांमधून सहलीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

परिवहन विभागदेखील शैक्षणिक सहलीसाठी सज्ज झाला आहे. शाळांना सवलतीत सहलीसाठी बस देण्याचे ठरले आहे. मात्र, सहलीसाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पहिल्यांदाच सहलीला जाणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शैक्षणिक सहलीतून आनंदाबरोबर नवीन माहितीत भर

शाळांच्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. त्याचबरोबर नवनवीन माहिती मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडते. राज्य सरकारने पर्यटन, ऐतिहासिक स्थळे खुली केल्याने सध्या पर्यटन व्यवसाय जोरात सुरू आहे.

शाळा सहलीसाठीच्या मार्गदर्शक सूचना

* समुद्र बीच, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या याठिकाणी सहलीचे नियोजन करू नये.
* पालकांच्या संमत्तीने मुलांनासहलीला घेऊन जाणे गरजेचे.
* सहलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने जाणे आवश्यक.
* कोणत्याही परिस्थितीत खासगी बसचा वापर करण्यात येऊ नये.
* प्रवासातील मुलांचे संरक्षण, आरोग्याची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापकांवर.
* मुलींचा सहभाग असेल तर सोबत महिला शिक्षिका असणे गरजेचे.
* प्रवास खर्चाबाबत पालकांची तक्रार येणार नाही, असे नियोजन करावे.

Back to top button