महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कर्नाटकचे २ हजार पोलीस तैनात, २१ नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त | पुढारी

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कर्नाटकचे २ हजार पोलीस तैनात, २१ नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त

निपाणी /कागल, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मंत्री आणि सीमा समन्वयक समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवार, दि. 6 रोजी बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. मात्र, या दौर्‍याला कर्नाटक सरकारचा तीव्र विरोध असल्याने या दोन्ही मंत्र्यांना रोखण्यासाठी कर्नाटकने कोल्हापूर जिल्ह्याजवळील कोगनोळी सीमेसह 21 तपासणी नाक्यांवर सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दूधगंगा नदीजवळ कर्नाटकची हद्द सुरू होते, तेथे पुणे-बंगळूर महामार्गावर बॅरिकेडस् लावण्यात आली आहेत. सीमाप्रश्न ही न्यायप्रविष्ट बाब आहे. तरीदेखील यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमध्ये मोठी जुंपली आहे. वास्तविक पाहता दोन्ही राज्यांमध्ये तसेच केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मंत्री पाटील व देसाई यांच्या दौर्‍याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. कारण ते बेळगावला येऊन कोणताही मेळावा घेणार नाहीत. त्यामुळे प्रक्षोभक भाषणाचा अथवा वक्तव्याचा प्रश्नच येत नाही. परंतु कर्नाटक सरकारने या गोष्टीची अनाठायी भीती बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे.

19 डिसेंबरला बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याच दिवशी बेळगावात मराठी भाषिकांचा मेळावा होतो. या मेळाव्याला दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक नेते गनिमी काव्याने येतात. त्यामुळे कर्नाटक सरकारने सीमाप्रश्न सुनावणी आणि मंत्र्यांच्या दौर्‍यांच्या निमित्ताने जी सीमेवर परिस्थिती तयार करून ठेवली आहे, त्याला या अधिवेशन आणि मेळाव्याची झालर असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा लांबला. परंतु यामुळे कर्नाटक सरकारची चिंता वाढल्याचे दिसत आहे.

Back to top button