कोल्हापूर : ‘ऑक्ट नाईन’च्या कार्यालयाच्या झडतीत वस्तू, कागदपत्रे जप्त | पुढारी

कोल्हापूर : ‘ऑक्ट नाईन’च्या कार्यालयाच्या झडतीत वस्तू, कागदपत्रे जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सामान्य गुंतवणूदारांसह उद्योग, व्यावसायिक व कारखानदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या ऑक्ट नाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन कंपनीच्या राजारामपुरी येथील कार्यालयाची राजारामपुरी पोलिसांनी रविवारी झाडाझडती घेतली. साडेतीन तासाहून अधिक काळ घेतलेल्या झडतीत पोलिसांनी सात लाख 50 हजार रुपये किमतीच्या वस्तू, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स जप्त केल्या आहेत.

गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के बोनस आणि दीड वर्षानंतर गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून ऑक्ट नाईन कंपनीच्या संचालकांनी शहर व जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. कंपनीचा म्होरक्या, संचालक अभिजित नागावकरसह तिघांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. संशयित नागावकरला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

साडेतीन तास झडती !

पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पथकाने संचालक नागावकर याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पथकाने ‘ऑक्ट नाईन’च्या राजारामपुरीतील तिसर्‍या गल्लीतील कार्यालयाची रविवारी दुपारी साडेतीन तास तपासणी केली.

विविध बँकांची पासबुके, फाईल्स जप्त

या शोधमोहिमेत लॅपटॉप,संगणक संच, विविध बँकांची पासबुके, फाईल्स, गुंतवणूकादारांचे करारपत्र, फर्निचरसह सुमारे साडेसात लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे ओमासे यांनी सांगितले.

कोट्यवधीची रक्कम कोठे मुरविली, याचाही लवकरच छडा

गुंतवणूकदाराकडून जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम संशयितांनी कोठे मुरविली, कोणत्या बँकेत गुंतविली, याचाही शोध घेण्यात येत आहे. संशयितांना आश्रय देणार्‍यांचाही शोध घेण्यात येत आहे. दाखल तक्रारीपेक्षा अधिक संख्येने गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत. संशयितांकडून फसगत झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहनही ओमासे यांनी केले आहे.

Back to top button