भारतीयांकडून जगण्याचा खर्च नियंत्रित | पुढारी

भारतीयांकडून जगण्याचा खर्च नियंत्रित

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : संपूर्ण जग महागाईने होरपळत असताना आणि महागाई रोखण्यासाठी विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांची तारेवरची कसरत सुरू असताना भारतीयांनी आपल्या कुटुंबीयांचा जगण्याचा खर्च (कॉस्ट ऑफ लिव्हिंग) नियंत्रित करून संपूर्ण जगापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

भारतीयांनी आपल्या या कृतीने अर्थव्यवस्थेवरील ताण कमी केला आहे. शिवाय, ‘संसार करावा नेटका’ या भारतीय संस्कृतीचा वस्तुपाठ कठीण काळात कसा कामाला येतो, याचेही प्रत्यंतर घडविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात अन्नधान्य व इंधनाच्या किमती गगनाला भिडू पाहत आहेत. यामुळे महागाई हातपाय पसरून अर्थकारणाला आव्हान देत आहे. या आव्हानाचा मुकाबला करताना अमेरिका, युरोप आणि चीनसारख्या विकसित देशांचीही दमछाक होत आहे.

महागाईच्या पार्श्वभूमीवर एसबीआय इकोरॅपने भारत, अमेरिका, युरोप, जर्मनी या जगातील तीन महत्त्वाच्या अर्थसत्तांमधील कौटुंबिक खर्चाचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. यानुसार सप्टेंबर 2021 मध्ये जर जगण्याचा खर्च संपूर्ण जगभरात 100 रुपये गृहीत धरला, तर त्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील खर्चामध्ये 12 रुपयांची वाढ झाल्याचे अनुमान निघते; पण जर्मनी व इंग्लंडमध्ये हीच वाढ अनुक्रमे 20 व 30 रुपये इतकी झाली आहे.

डॉलर्सच्या तुलनेत 57 टक्क्यांनी झेप

चार आर्थिक महासत्तांचा अभ्यास करताना विनिमय दराचाही विचार करण्यात आला आहे. शिवाय, निवास खर्चाच्या तुलनेतही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अहवालात भारतातील दरडोई उत्पन्नाने डॉलर्सच्या तुलनेत 57 टक्क्यांनी झेप घेतली असल्याचे नमूद करताना भारतातील आर्थिक स्थिती तुलनेने नियंत्रित असल्याकडे लक्ष वेधले आहे.

Back to top button