कोल्हापूर : मार्चअखेर संपूर्ण शहराला पाईपलाईनद्वारे गॅस | पुढारी

कोल्हापूर : मार्चअखेर संपूर्ण शहराला पाईपलाईनद्वारे गॅस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण शहराला मार्चअखेर पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे. शहरात प्रायोगिक तत्त्वावर तीनशे घरांमध्ये कदमवाडी, भोसलेवाडी, रूईकर कॉलनीमध्ये तीनशे घरांमध्ये गॅस पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात यासाठी 29 हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. शहरात 15 हजार मीटर जोडणी झाली आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम व ऑईल इंडिया कंपनीकडून कोल्हापूर शहरात पाईलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. घरगुती व औद्योगिक वापरासाठी हा गॅस चालणार आहे. मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथून कोल्हापूर शहर व जिल्ह्याला पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांत गॅसच्या पिवळ्या रंगाच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत.

पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा झाल्याने ग्राहकांना सतत पुरवठा होणार आहे. यासाठी प्रत्येक घरात मीटर बसवले जाणार आहे. जेवढा गॅसचा वापर होईल तेवढा दर आकारला जाणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमध्येही आता पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. गोकुळ शिरगाव, शिरोली एमडीसी व कागल एमआयडीसीतील उद्योगांना कच्चा माल वितळवण्यासाठी विजेऐवजी गॅसचा वापर केल्यास एकूण वीज बिलात 50 टक्के बचत होणार आहे.

शहरातील कदमवाडी, भोसलेवाडी, रूईकर कॉलनी परिसरातील घरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जात आहे. काही हॉटेलमध्ये तसेच शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत गॅसपुरवठा सुरू आहे. कागल येथे लवकरच मेन स्टेशन तयार करण्यात येणार आहे.

पंचगंगा नदीपलीकडील भागात पाईपलाईन टाकण्याचे काम थांबले होते; पण तेही काम लवकर पूर्ण झाल्याने संपूर्ण शहराला मार्चअखेर पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. कोल्हापूर शहराबरोबरच, इचलकरंजीमध्येही पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर अन्य तालुक्यांत पाईपलाईन टाकून त्याद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे.

Back to top button